Pune : अनुदानही नको, “ई-रिक्षा’ही नको!

पुणे : “नॅशनल क्लीन एअर’ कार्यक्रमांतर्गत महापालिकेकडून ई- रिक्षा खरेदी करणाऱ्यांना २५ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते. मात्र, वर्षभरात केवळ १०० जणांनीच या अनुदानासाठी अर्ज केला आहे. तर महापालिकेकडून ५ हजार रिक्षांना हे अनुदान देण्याची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.
बाजारात ई-रिक्षांची किंमत अधिक असल्याने त्याची कमी प्रमाणात खरेदी होत आहे. त्यामुळे या अनुदानासाठी अर्ज येत नसल्याची माहिती महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून देण्यात आली. या अनुदानासाठी पालिकेने साडेबारा कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. शहरात सुमारे ८० हजारांहून अधिक प्रवासी रिक्षा आहे.
यातील बहुतांश वाहने “सीएनजी’ इंधनावर चालतात. मात्र, आता ई- रिक्षाही उपलब्ध झाल्या असून इतर रिक्षांच्या तुलनेत त्या कमी प्रदूषण करतात. त्यामुळे महापालिकेकडून ई-रिक्षांना प्राधान्य दिले जात आहे. त्यासाठी नवीन नोंदणी होणाऱ्या ई-रिक्षाला २५ हजार रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे.
किंमत अधिक असल्याने पाठ
“सीएनजी’वरील रिक्षाची किंमत तीन ते साडेतीन लाखांच्या आसपास आहे. तर, ई-रिक्षाची किंमत त्यापेक्षा दीड ते दोन लाख रुपये अधिक आहे. रिक्षा चालकांची स्थिती आधीच अडचणीची असल्याने कर्ज उचलून ते रिक्षा घेतात. त्यामुळे ई-रिक्षा आणखी महाग पडतात. त्याची देखभाल दुरुस्ती तसेच इतर तांत्रिक शंका असल्याने या रिक्षा खरेदीकडे पाठ फिरवली जात आहे. रिक्षाच्या किमतीच्या तुलनेत महापालिकेचे अनुदानही कमी असल्याने ते वाढविण्याची मागणीही केली जात आहे.





