पुणे जिल्हा : बराकीला आग लागल्याने कांद्याचे मोठे नुकसान

पारगाव शिंगवे – लाकडी बराकीत साठवून ठेवलेल्या कांद्याला आग लागल्याने बराकीतील कांद्याचे नुकसान होवून शेतकऱ्याचे २ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. ही घटना शुक्रवारी (दि.३०) रोजी दुपारी दीड वाजण्याच्या खडकवाडी येथील धुमाळस्थळ येथे घडली. संदीप बबन धुमाळ यांनी या घटनेची पारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खडकवाडी येथील धुमाळस्थळ येथे कांदा उत्पादक शेतकरी संदीप धुमाळ यांनी दोन महिन्यापूर्वी शेतातील कांदा काढून तो लाकडी बराकीत साठवून ठेवलेला होता. हा कांदा अंदाजे ६०० पिशव्या होता.
कांदा साठवून ठेवण्यासाठी तयार केलेली बराकी ही लाकडाची व बाजरीच्या ताटे यांच्यापासून बनवलेली होती. शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कांदा बराकीला आग लागली.
साठवून ठेवलेल्या कांदा बराकीच्या दोन्ही बाजूने बाजरीची ताटे व लहान लाकडे पेटल्याने या आगीत लाकडी बराकी जळून गेली. त्यात साठवून ठेवलेल्या कांद्याचे मोठे नुकसान झाले. पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा तपास पारगाव पोलीस करत आहेत.





