Gautam Gambhir : भारतीय संघाची कामगिरी अभिमानास्पद; प्रशिक्षक गौतम गंभीरने केले कौतुक

लंडन : भारत व इंग्लंड दरञान सुरु असलेली कसोटी मालिकेत यजमान सध्या २-१ असे आघाडीवर आहेत. इंग्लंडने पहिल्या व तिसऱ्या कसोटीत तर भारताने दुसऱ्या कसोटीत विजय मिळवला होता. चौथी कसोटी अनिर्णित राहिली होती. आता शेवटची कसोटी ओव्हलच्या मैदानावर गुरुवारपासून खेळविण्यात येणार आहे. ही कसोटी भारतासाठी जिंकणे आवश्यक असून, पाचवी कसोटी जिंकल्यानंतर मालिकेत बरोबरी होवू शकेल. दोन्ही संघ विजयासाठी चांगलेच झुंजले असल्याने, त्यांच्या खेळाला प्रेक्षकांकाडून देखील चांगली दाद मिळाली आहे. इंग्लंडचा दौरा हा नेहमीच कठिण असतो. मात्र, या मालिकेत खेळले गेलेल्या क्रिकेटचा प्रत्येकाला अभिमान असल्याचे भारतीय संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर म्हणाले.
चौथ्या कसोटीत भारतीय फलंदाजांनी जिगर दाखवताना ती कसोटी अनिर्णित राखली. यावेळी मैदानावर उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी भारतीय संघाला चांगले प्रोत्साहन दिले. भारतीय उच्चायुक्तालयाने आयोजित केलेल्या भारतीय वंशाच्या स्वागत समारंभात समुदाय नेते, खासदार आणि क्रीडाप्रेमींनी भारतीय संघाचे जल्लोषात स्वागत केले. संघाला प्रेक्षकांनी दिलेल्या पाठिंब्यासाठी प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी सर्वांचे आभार मानले.
गंभीर म्हणाले की, इंग्लंडचा दौरा हा नेहमीच कठिण असतो. दोन्ही देशांमधील इतिहास विसरता येण्यासारखा नाही. दोन्ही संघ नेहमीच तडफदार खेळ करतात. जेव्हा जेव्हा भारतीय संघाने इंग्लंडचा दौरा केला आहे, त्या प्रत्येक वेळी येथील चाहत्यांनी आम्हाला भरपूर पाठिंबा दिला आहे. गेले पाच आठवडे दोन्ही संघांसाठी खूप रोमांचक होते. मालिकेत खेळल्या गेलेल्या क्रिकेटचा नक्कीच क्रिकेट प्रेमींना अभिमान असेल, असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, दोन्ही संघांनी चांगली स्पर्धात्मक कामगिरी केली आहे. आपला संघ मालिकेत जरी पिछाडीवर असला तरी अजून मालिका संपण्यासाठी अठवडाभराचा अवधी शिल्लक आहे. आम्ही देशवासियांना आणि येथे उपस्थित असलेल्या नागरिकांना अभिमान वाटावा, अशी कामगिरी करण्याचा निश्वित प्रयत्न करु, असा आत्मविश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
लढावू वृत्ती हे नव्या भारताचे प्रतिक
भारतीय उच्चायुक्तालयाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी इंग्लंडमधील भारताचे उच्चायुक्त विक्रम दुराईस्वामी म्हणाले की, या मालिकेत भारतीय संघाने चांगली लढावू वृत्ती दाखवली आहे. ही वृत्ती म्हणजे प्रतिकुल परिस्थितीत देखील लढण्याच्या देशाच्या इच्छाशक्तीचे प्रतिबिंब आहे. ही एक उत्तम मालिका असून उत्साहाने खेळण्यात येत आहे. सर्व सामने पाचही दिवस चालले. आमच्या संघाने या मालिकेत जी लढावू वृत्ती दाखवली, ही नव्या भारताच्या वृत्तीचे प्रतिक आहे आहे. पाचव्या कसोटीचा निकाल काहीही असो, आम्हाला आमच्या संघाचा अभिमान असल्याचे ते म्हणाले.





