Pune Rural News : गौरी सजावटीतून वेधले मराठा आरक्षणाकडे लक्ष

भिगवण : गणेशोत्सवा निमित्त सर्वत्र गौरी गणपतीच्या आकर्षक व सामाजिक सांस्कृतिक परंपरेचे दर्शन, ग्रामीण जीवनशैलीचा संदेश देणाऱ्या सजावटी सर्वत्र पाहायला मिळत आहेत.
सध्या गौरी गणपतीचा सण उत्सव सुरू असतानाच मराठा आरक्षनासाठी आंदोलन सुद्धा सुरू असून महाराष्ट्रातील मराठा समाजातील वयोवृद्धापासुन महिला, मुली व तरुण यात सहभागी झाले आहेत. प्रत्येकजण आपापल्या परीने या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुढे सरसावला आहे.
येथील रहिवाशी असणाऱ्या गृहिणी राणी किरण लंगोटे यांनी गाव खेड्यातील महिलांनी या आंदोलनात सहभागी होऊन मुंबई येथे आझाद मैदानात गेलेल्या आपल्या आंदोलकांना खाण्यापिण्याचे साहित्य पाठविण्याचे आवाहन तर केलेच आहे. पण गौरी सजावट करून गाव खेड्यातील महिलांच्या प्रपंचातील दैनंदिन कामे करताना आमचे लक्ष या आंदोलनाकडे कसे लागुन राहिले आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.
या सजावटीमध्ये प्रमुख आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रतिमा असलेला फोटो समोरच ठेवून त्यांना दीर्घायुष्य मिळावे व त्यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला यश मिळावे ही भावना व्यक्त करताना यातून दाखविले आहे. इतर महिलांना हा देखावा पाहण्याची विनंती करुन या आंदोलनात आपण ही सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले आहे.





