Talegaon MIDC : तळेगाव एमआयडीसीत गॅस गळती; अपघातात दोघांचा मृत्यू
Talegaon MIDC : तीन कामगारांवर उपचार सुरु

Talegaon MIDC : तळेगाव एमआयडीसी परिसरातील शॅफ्लर इंडिया कंपनीत अग्निशमन यंत्रणेच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना कार्बन डायऑक्साइड गॅस गळतीची गंभीर दुर्घटना घडली. या दुर्घटनेत दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तीन कामगारांना प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेमुळे औद्योगिक क्षेत्रात खळबळ उडाली असून कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नवलाख उंबरे येथील शॅफ्लर इंडिया कंपनीच्या परिसरात मंगळवारी (दि. ९) ही घटना घडली. सुरुवातीला गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र प्राथमिक तपासात अग्निशमन यंत्रणेच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामादरम्यान कार्बन डायऑक्साइड गॅसची गळती झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
काम सुरू असताना दुपारी अचानक अग्निशमन सिलिंडरमधून कार्बन डायऑक्साइड गॅसची गळती सुरू झाली. अल्पावधीतच गॅसचा प्रादुर्भाव वाढल्याने तीन कर्मचारी बेशुद्ध पडले. या दुर्घटनेत वैभव थोरात आणि गौरीशंकर शर्मा या दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला. तर कृष्णा साहू, प्रमोद जैस्वार आणि नरसिंह पाटील हे तिघेजण जखमी झाले आहेत. प्रमोद जैस्वार यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उषा फायर सर्व्हिसेसच्या कर्मचाऱ्यांकडून अग्निशमन यंत्रणेच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. या कामात गौरीशंकर शर्मा, वैभव थोरात, प्रमोद जैस्वार, कृष्णा साहू आणि सुशोभन पाखीरा हे कर्मचारी सहभागी होते.
कंपनीचे कर्मचारी कृष्णा साहू आणि सुशोभन पाखीरा हे देखील तेथे उपस्थित होते. घटनेची माहिती मिळताच कंपनी प्रशासन, एमआयडीसी सुरक्षा विभाग, अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलिसांकडून केला जात असून, औद्योगिक सुरक्षा नियमांचे पालन करण्यात काही त्रुटी राहिल्या होत्या का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.
हेही वाचा:




