Talegaon MIDC Accident : तळेगावात भीषण अपघात! ओला स्कूटरला भरधाव स्विफ्टची धडक; तरुणाचा जागीच मृत्यू
Talegaon MIDC Accident : भरधाव वेगात येणाऱ्या कारने समोरून धडक दिल्याने दुचाकीवरील एका तरुणाचा मृत्यू झाला. तर दुचाकी चालक जखमी झाला आहे.

Talegaon MIDC Accident – भरधाव वेगात येणाऱ्या कारने समोरून धडक दिल्याने दुचाकीवरील एका तरुणाचा मृत्यू झाला. तर दुचाकी चालक जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी (दि. ३ मार्च) सकाळी १० वाजताच्या सुमारास बधलवाडी ते नवलाख उंबरे जाणाऱ्या रोडवर ह्युंडाई ग्लोविज कंपनीच्या वेअरहाऊस जवळ घडली.
चंद्रकांत शिवाजी हेमनार असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सिद्धेश्वर शंकर लोहार (वय २९, रा. ताथवडे, पुणे) यांनी मंगळवारी (दि. ३) तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कार चालक अविनाश कैलास ससाणे (रा. वेल्हावले, खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सिद्धेश्वर आणि त्यांचा मित्र चंद्रकांत हे दोघे ओला इलेक्ट्रिक स्कूटरवरून कामावर जात होते. यावेळी समोरून येणाऱ्या स्विफ्ट कारच्या चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात गाडी चालवत फिर्यादीच्या स्कुटीला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात फिर्यादी जखमी झाले असून त्यांचा मित्र चंद्रकांत हेमनार यांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.





