Chakan Accident - भरधाव वेगात जाणाऱ्या आयशर टेम्पोने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (दि. ३१ मार्च) रोजी दुपारी दीडच्या सुमारास तळेगाव-चाकण रोडवर घडला. विजय तुळशीराम कापडे (रा. चाकण) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी राहुल मनोहर पाटील (वय ३३, रा. चाकण, ता. खेड, जि. पुणे) यांनी मंगळवारी (दि. ३१ मार्च) रोजी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी टेम्पो चालक अरविंदकुमार विजय बहादूर यादव (वय ५०, रा. वसई, पालघर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चालक हा आपला आयशर टेम्पो (MH 48 DC 1211) घेऊन तळेगावकडून चाकणच्या दिशेने जात होता. त्याने रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून वेगाने गाडी चालवत समोरून येणाऱ्या होंडा शाइन दुचाकीला धडक दिली. या भीषण धडकेत विजय कापडे यांच्या डोक्याला आणि हाता-पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक रेळेकर या प्रकरणाचा तपास करीत आहेत.