Gary Kirsten : टी-२० विश्वचषक संपताच नवीन मुख्य प्रशिक्षकाची घोषणा, ६४ शतके ठोकणाऱ्या अनुभवी खेळाडूकडे सोपवण्यात आली धुरा
Gary Kirsten : १५ एप्रिलपासून आपल्या पदाची सूत्रे स्वीकारतील आणि त्यांचा हा करार दोन वर्षांसाठी असेल.

Gary Kirsten appointed as Sri Lanka head coach : टी-२० विश्वचषक २०२६ च्या समाप्तीनंतर सनथ जयसूर्याने श्रीलंका संघाचे प्रशिक्षकपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या रिक्त झालेल्या जागी आता दक्षिण आफ्रिकेचे माजी फलंदाज आणि अनुभवी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांची वर्णी लागली आहे. १५ एप्रिलपासून कर्स्टन आपल्या पदाची सूत्रे स्वीकारतील आणि त्यांचा हा करार दोन वर्षांसाठी असेल. विशेष म्हणजे, नुकत्याच पार पडलेल्या टी-२० विश्वचषकात ते नामिबिया संघाचे सल्लागार म्हणून काम पाहत होते.
प्रशिक्षक म्हणून दांडगा अनुभव –
५८ वर्षांच्या गॅरी कर्स्टन यांचा प्रशिक्षक म्हणून आलेख अत्यंत प्रभावी आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषकावर नाव कोरले होते आणि कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले होते. याशिवाय त्यांनी दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तानच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारीही सांभाळली आहे. मात्र, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाशी झालेल्या मतभेदांमुळे त्यांनी अवघ्या सहा महिन्यांतच राजीनामा दिला होता. आयपीएलमध्ये आरसीबी आणि गुजरात टायटन्ससोबतही त्यांनी काम केले आहे.
श्रीलंकेसमोर मोठे आव्हान –
🚨 NEW HEAD COACH OF SRILANKA 🚨
• 🇱🇰 After Sanath Jayasuriya stepped down from coaching Sri Lanka, Gary Kirsten became the new head coach of Sri Lanka….Seemore pic.twitter.com/VYenPAbmji
— lndian Sports Netwrk (@IS_Netwrk29) March 9, 2026
श्रीलंकेचा संघ सध्या कठीण काळातून जात आहे. २०१४ मध्ये टी-२० विश्वचषक जिंकल्यापासून श्रीलंकेला कोणत्याही आयसीसी स्पर्धेत मोठी मजल मारता आलेली नाही. गेल्या वर्षी ते चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्रही ठरू शकले नव्हते. पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेला पुन्हा रुळावर आणण्याचे मोठे आव्हान कर्स्टन यांच्यासमोर असेल.
खेळाडू म्हणूनही दमदार कारकीर्द –
गॅरी कर्स्टन यांनी दक्षिण आफ्रिकेसाठी १०१ कसोटी आणि १८५ एकदिवसीय सामने खेळले आहेत. कसोटीत त्यांच्या नावावर ७२८९ धावा असून त्यात २१ शतकांचा समावेश आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यांनी ६७९८ धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेसाठी वनडेमध्ये १८८ धावांची सर्वोच्च खेळी करण्याचा विक्रम आजही त्यांच्याच नावावर अबाधित आहे.





