Garbage Issue Satara : पालिकेचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर! साडेसहाशे सफाई कर्मचारी, ४० मुकादम; तरीही कचऱ्याचे ढीग
Garbage Issue Satara : कर्मचारी आणि मुकादम यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे साताऱ्यातील स्वच्छता धोक्यात; रामाचा गोट आणि शुक्रवार पेठेत कचऱ्याचे ढीग कायम.

Garbage Issue Satara – पालिकेच्या आरोग्य विभागातील ढिसाळ कारभारामुळे शहरातील स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तब्बल साडेसहाशे सफाई कर्मचारी आणि ४० हून अधिक मुकादमांची फौज असतानाही शहरातील अनेक भागांमध्ये कचऱ्याचे ढीग पडून राहत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कर्मचारी आणि मुकादम यांच्यातील समन्वयाचा अभाव, कामावरील शिथिलता आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष यामुळे स्वच्छता व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याची चर्चा आहे.
पालिकेतील एका नगरसेविकेने एका मुकादमाविरोधात थेट आरोग्य विभागाकडे तक्रार केल्याची माहिती मिळाली. हा मुकादम कामाच्या वेळेत सफाई व्यवस्थेवर लक्ष ठेवण्याऐवजी रिक्षा चालवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे त्याच्या कार्यक्षेत्रातील भागांमध्ये स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून नागरिकांना त्याचा फटका बसत आहे. याशिवाय काही मुकादमांमध्ये नेमणुकीच्या वैधतेवरून वाद सुरू असल्याचे सांगितले जाते.
शहरातील एका पुलाखाली दोन मुकादमांमध्ये याच कारणावरून वाद झाल्याची तक्रार नगराध्यक्षांपर्यंत पोहोचली. मात्र, त्यानंतरही विभागातील कारभारात कोणताही सकारात्मक बदल झालेला दिसून आलेला नाही. आरोग्य विभागाचे प्रमुख राकेश गलीयल यांच्यावरही नियंत्रण नसल्याची टीका होत आहे. कागदोपत्री अहवाल आणि बैठका यापलीकडे विभागीय यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत नसल्याचा आरोप होत असून, प्रत्यक्ष मैदानात स्वच्छतेची स्थिती मात्र दिवसेंदिवस खालावत चालली आहे.
रामाचा गोट परिसरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयासमोर सातत्याने कचरा पडून राहत असल्याच्या तक्रारी आहेत. तसेच शुक्रवार पेठेतील कोटेश्वर मंदिराच्या मागील परिसरातही कचऱ्याचे ढीग साचलेले दिसतात. अनेक दिवस हा कचरा उचलला जात नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. संबंधित ठिकाणी सफाई कर्मचारी नियमित फिरकत नसल्याचा आरोप होत असून मुकादमांकडूनही याची गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, काही मुकादमांच्या माध्यमातून सफाई कर्मचारी एकाच वेळी आठवडाभराच्या रजा मंजूर करून घेत असल्याच्या धक्कादायक तक्रारीही पुढे येत आहेत. त्यामुळे कर्मचारी आणि पर्यवेक्षण यंत्रणा यांच्यातील संगनमताबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ‘तेरी भी चुप, मेरी भी चुप’ अशा पद्धतीने कारभार सुरू असल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगू लागली आहे. स्वच्छ शहराचा दावा करणाऱ्या पालिकेच्या आरोग्य विभागाची वस्तुस्थिती मात्र वेगळीच असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. नागरिकांच्या तक्रारी वाढत असताना जबाबदार अधिकाऱ्यांकडून ठोस कारवाई कधी होणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.






