पुणेः गइलेन बॅरी सिंड्रोम अर्थात जीबीएसची रुग्णसंख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. पुण्यात जीबीएसचा ९ जानेवारीपासून उद्रेक झाल्याचे पाहिला मिळाले. आत्तापर्यंत या आजाराने ८ जणांचा बळी घेतला आहे. जीबीएसची एकूण रुग्णसंख्या २०५ वर जाऊन पोहचली आहे. या आजाराचे सर्वाधिक रुग्ण हे सिंहगड आणि नांदेड सिटी परिसरात असल्याचे तपासणीत निष्पन्न झाले आहे. तसेच जीबीएसची लागण ही दूषित पाण्यामुळे झाल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
सिंहगड परिसरात आढळलेले ९० रुग्ण नांदेड गावातील विहीर आणि खडकवासला धरणातील पाण्याचा स्रोत वापरणारे आहेत. या परिसरातील ३ रुग्णांचा मूत्यू जीबीएसमुळे झाला आहे. त्यातील दोघांचा मृत्यू जीबीएस तर एकाचा मृत्यू इतर कारणामुळे झाल्याचे पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून खबरदारीचा उपाय म्हणून येथील भागात घरोघरी जात सर्वेक्षण करण्यात आल्यानंतर जीबीएसचे कारण दूषित पाणी असल्याचे समोर आले. सिंहगड परिसरातील रुग्णांमध्ये प्रामुख्याने कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी आणि नोरोव्हायरसचा संसर्ग आढळून आला असून, हेच जीबीएस उद्रेकाचे कारण असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने शुक्रवारी दिली. सिंहगड रस्ता परिसरातील जीबीएस रुग्णांच्या तपासणीमध्ये २५ रुग्णांमध्ये कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी हा जीवाणू संसर्ग निष्पन्न झाला आहे. तर ११ रुग्णांना नोरोव्हायरस हा विषाणू संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले आहे.