Ganeshotsav: महागाईवर श्रद्धेची मात! गणरायाच्या दागिन्यांची खरेदी जोरात, खण आळी ते सदाशिव पेठेत गर्दी
Ganeshotsav: गणपतींसाठी पारंपरिक पेशवाई थाटातील मुकुटांसह आधुनिक अलंकारांची मोठी मागणी; महागाई असूनही सराफ बाजारात खरेदीचा उत्साह कायम.

Ganeshotsav – गणेशोत्सवाची चाहूल लागताच सातारा शहरातील बाजारपेठा गणरायाच्या सजावटीच्या साहित्याने गजबजल्या असून, यंदा गणपतीच्या दागिन्यांना मोठी मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. घरगुती गणपतींपासून सार्वजनिक मंडळांच्या मोठ्या मूर्तींपर्यंत आकर्षक मुकुट, हार, मोत्यांच्या माळा, बाजूबंद, कंठहार, कुंडले, सोंड व अन्य अलंकार बाजारात उपलब्ध झाले आहेत.
गणपतीच्या मूर्तीच्या आकारानुसार दागिन्यांची निवड केली जाते. सातार्यात भव्य मूर्तींचे प्रमाण असल्यामुळे दागिने सुद्धा तितक्याच भव्य स्वरूपाच्या असण्याबाबत कार्यकर्त्यांनी लक्ष पुरवले आहे. घरगुती गणपतींसाठी हलके आणि आकर्षक दागिने, तर सार्वजनिक मंडळांच्या मोठ्या मूर्तींसाठी भव्य आकाराचे अलंकार तयार केले जात आहेत. मूर्तीला अनुरूप दागिने तयार करण्यासाठी विक्रेत्यांकडून विशेष ऑर्डरही घेतल्या जात आहेत.
यंदा पर्ल, कुंदन, ऑक्सिडाइज्ड मेटल, सोनसळी तसेच चांदीच्या रंगातील दागिन्यांना ग्राहकांची पसंती मिळत आहे. पारंपरिक पेशवाई थाटातील मुकुट, हार यांसोबतच आधुनिक डिझाइनच्या दागिन्यांनाही मागणी आहे. काही ग्राहक जुन्या दागिन्यांना पॉलिश करून घेण्यासही प्राधान्य देत आहेत. घरगुती गणपतीच्या सजावटीसाठी मूषक, सुताचे किंवा मोदकांचे सेट, उपरणे, सोंड, कर्णफुले, बाजूबंद, तोडे, कंठी आणि जानवे अशा विविध प्रकारच्या अलंकारांची खरेदी केली जात आहे.
बजेटनुसार विविध पर्याय
ग्राहकांच्या बजेटचा विचार करून दागिन्यांचे विविध संग्रह खण आळी ते सदाशिव पेठ येथील सराफ बाजारात उपलब्ध करण्यात आले आहेत. कमी किमतीतील साध्या अलंकारांपासून आकर्षक आणि महागड्या डिझाइन पर्यंत अनेक पर्याय असल्याने ग्राहकांना आपल्या आवडीनुसार खरेदी करता येत आहेत. हे डिझाईन 5000 पासून ते अगदी लाखापर्यंतच्या आणि त्याही पुढच्या किमतीपर्यंत आहे.
बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण…
दरवर्षीप्रमाणे यंदाही दागिन्यांसाठी मोठी मागणी आहे. यंदा मोठ्या म्हणजे अगदी एक किलो चांदीच्या मोदकांना देखील मागणी आहे. गणपतीच्या गळ्यातील हार, बाजूबंद यांना ग्राहकांकडून मागणी असल्यामुळे विशेष स्वरूपाचे दागिने बनवण्याचे वातावरण सध्या सराफ बाजारामध्ये आहे. दागिन्यांच्या किमती कितीही वाढल्या तरी परमेश्वरावरील श्रद्धा आणि सणांची परंपरा ही मानसिकता असल्याने मराठी माणूस दागिन्यांची खरेदी करतोच करतो त्यामुळे बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण आहे.
– किशोर घोडके, सराफ व्यावसायिक.






