Ganeshotsav DJ Rules: गणेशोत्सवातील डीजेवर पोलिसांची नजर! आयुक्तालयात पार पडली डीजे सिस्टिमची ‘साउंड टेस्ट’
Ganeshotsav DJ Rules: आवाज वाढवणाऱ्या आणि कर्णकर्कश ध्वनी निर्माण करणाऱ्या 'प्रेशर मिड' उपकरणांवर विशेष लक्ष; कायद्याच्या चौकटीत उत्सव साजरा करण्याचे आवाहन.

Ganeshotsav DJ Rules – पुणे पोलिसांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजे साउंड सिस्टिममुळे होणारे ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी आयुक्तालयात विविध प्रकारच्या साउंड सिस्टिमची प्रत्यक्ष चाचणी घेतली. यावेळी आवाजाची डेसिबल पातळी, स्पीकरची क्षमता आणि ध्वनिप्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या उपकरणांची माहिती घेण्यात आली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे,
विशेष शाखेचे उपायुक्त प्रशांत अमृतकर, सहायक आयुक्त विवेक पवार यांच्यासह पुणे साउंड असोसिएशनचे पदाधिकारी आणि साउंड व्यावसायिक यांच्या उपस्थितीत ही साउंड टेस्ट घेण्यात आली. यावेळी विविध प्रकारचे स्पीकर, बेस आणि टॉप यांचे संयोजन तसेच त्यातून निर्माण होणाऱ्या ध्वनीची तीव्रता डेसिबल मॉनिटरद्वारे मोजण्यात आली.
कर्णकर्कश प्रेशर मिड वर लक्ष
डीजे स्पीकरमध्ये बसविल्या जाणाऱ्या प्रेशर मिड या उपकरणामुळे मोठा आवाज वाढविता येतो, यातून कर्णकर्कश ध्वनी निर्माण होतो. पुणे साउंड असोसिएशननेही अशा अनधिकृत उपकरणांच्या वापराला विरोध दर्शविला आहे. ध्वनिप्रदूषण प्रतिबंधक नियम आणि पर्यावरणविषयक कायद्यांनुसार निश्चित करण्यात आलेल्या डेसिबल मर्यादांचे पालन व्हावे, यासाठी ही साउंड टेस्ट घेण्यात आली. विविध साउंड सिस्टिमची रचना आणि त्यामधील बदलांची माहिती घेऊनच पुढील धोरण निश्चित पोलिसांकडून केले जाणार आहे.
“गणेशोत्सवात वापरल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या डीजे सिस्टिम आणि त्यांच्या ध्वनिपातळीची तपासणी करण्यात आली आहे. कर्णकर्कश आवाज निर्माण करणाऱ्या उपकरणांबाबत माहिती संकलित करण्यात आली असून त्याआधारे पुढील निर्णय घेणार आहोत.”
– विवेक पवार, सहायक आयुक्त
“ध्वनिप्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या अनधिकृत उपकरणांवर नियंत्रण आणल्यास नागरिकांचा त्रास कमी होईल. गणेशोत्सवात कायद्याच्या चौकटीत राहून उत्सव साजरा करण्यास साउंड व्यावसायिकांची तयारी आहे.”
– बबलू रमजानी, अध्यक्ष, पुणे साउंड असोसिएशन





