Satara: गणेशोत्सवात ध्वनीप्रदूषण टाळणारे उपाय हवेत कारवाईचा फक्त देखावा नको; ‘आवाजाच्या भिंतीं’बाबत प्रशासनाची भूमिका स्पष्ट हवी
Satara गणेशोत्सवाचा उत्साह, पारंपरिक वाद्यांची परंपरा याला कोणाचाही विरोध नाही. मात्र, ध्वनिवर्धक यंत्रणांच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या कर्णकर्कश आवाजामुळे नागरिकांचे आरोग्य, वृद्ध, लहान मुले, रुग्ण आणि विद्यार्थ्यांना होणारा त्रास दुर्लक्षित करता येणार नाही.

Satara: गणरायाच्या आगमनाला अवघे काही दिवस उरले असताना सातारा शहरात पुन्हा एकदा ध्वनिप्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीदिनी सातारा पोलिसांनी ध्वनिवर्धक यंत्रणांवर कारवाई केली. या कारवाईचे स्वागत होत आहे. मात्र, एक- दोन दिवसांच्या कारवाईपुरते प्रशासनाचे कर्तव्य मर्यादित राहणार की यंदाचा गणेशोत्सव ध्वनिप्रदूषणमुक्त करण्यासाठी ठोस निर्णय घेतला जाणार हा खरा प्रश्न आहे.
गणेशोत्सवाचा उत्साह, पारंपरिक वाद्यांची परंपरा याला कोणाचाही विरोध नाही. मात्र, ध्वनिवर्धक यंत्रणांच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या कर्णकर्कश आवाजामुळे नागरिकांचे आरोग्य, वृद्ध, लहान मुले, रुग्ण आणि विद्यार्थ्यांना होणारा त्रास दुर्लक्षित करता येणार नाही. उत्सवाच्या नावाखाली ‘आवाजाची भिंत’ उभी करून त्यामागचे अर्थकारण जपायचे आणि नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करायचे, हा प्रकार थांबण्याची गरज आहे. ध्वनिवर्धक यंत्रणा व्यावसायिकांचा युक्तिवाद आहे की, पारंपरिक वाद्ये, वाहनांचे हॉर्न, मोठ्याने ओरडणे यामुळेही मोठा आवाज निर्माण होतो. हा युक्तिवाद काही अंशी ग्राह्य असला तरी इतरत्र नियमभंग होतो म्हणून ध्वनिवर्धकांना नियमभंगाची मुभा देता येणार नाही. सर्व ध्वनीस्रोतांसाठी समान आणि वैज्ञानिक निकष लागू झाले पाहिजेत. ध्वनीची तीव्रता किती आहे, किती काळ आहे आणि नियमांचे उल्लंघन होते का, हे अधिकृत ध्वनिमापक यंत्राद्वारे तपासले पाहिजे. विसर्जनाच्या दिवशी मोठ्या क्षमतेच्या यंत्रणांमुळे ध्वनीपातळी धोकादायक पातळीवर जाते, अशा तक्रारी असताना केवळ नंतर कागदोपत्री कारवाई करून उपयोग नाही.
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी यंदा स्पष्ट आणि कठोर भूमिका घेण्याची गरज आहे अशी सातारकरांची मागणी आहे. सदरबाजार येथील नागरिकांच्या गटाने प्रत्यक्ष जिल्हाधिकाऱ्यांना भेटून ध्वनिवर्धन यंत्रणांवर बंदी घालावी अशी मागणी केली होती अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात ध्वनीवर्धक यंत्रणा वाजवा अशा स्पर्धा भरवण्याचा इशारा देण्यात आला आहे. ध्वनिवर्धक यंत्रणांना परवानगी द्यायची असेल तर वेळ, ध्वनीमर्यादा आणि प्रत्यक्ष मोजणी याबाबत कठोर अटी असाव्यात. अन्यथा आवाजांच्या भिंतींवर निर्बंध घालण्याचा निर्णय घ्यावा, अशी सातारकरांच्या अपेक्षा आहे.
धोकादायक इमारतींचा आढावा घेण्याची मागणी
गणेश विसर्जन मार्गावरील धोकादायक व जीर्ण इमारतींचाही प्रशासनाने तातडीने आढावा घ्यावा. हजारो गणेशभक्त मिरवणुकीत सहभागी होणार असताना संभाव्य दुर्घटनेचा धोका दुर्लक्षित करून चालणार नाही. गणेशोत्सव भक्तीचा आहे, डेसिबलच्या स्पर्धेचा नव्हे. यंदा तोंडदेखल्या कारवाया नकोत. प्रशासनाने उत्सवापूर्वीच स्पष्ट निर्णय घ्यावा आणि नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य द्यावे, अशी मागणी पुढे येत आहे .





