Ganeshotsav: बाप्पाच्या ‘या’ नव्या रूपावर भाविक फिदा; पिंपरी-चिंचवडच्या बाजारात गणेशमूर्तींची प्रचंड क्रेझ
Ganeshotsav: पेणच्या मूर्तींसह शाडूच्या बाप्पाला पर्यावरणप्रेमींची पसंती; छत्रपती शिवाजी महाराज आणि श्रीरामाच्या रूपातील मूर्ती ठरतातय विशेष आकर्षण.

Ganeshotsav – गणरायाच्या आगमनासाठी पिंपरी-चिंचवड सज्ज होत आहे. बाजारपेठांमध्ये खरेदीची लगबग वाढली आहे. गणेशमूर्तींचे स्टॉल्स सजले आहेत. सजावटीचे साहित्यही मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहे. यंदा फेटा, पगडी, जिरेटोप आणि भरजरी पोशाखातील गणेशमूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत. पिंपरी, चिंचवड स्टेशन, भोसरी, आकुर्डी आणि सांगवी परिसरात गणेशमूर्तींचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत.
विविध आकारांच्या मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध आहेत. शहरालगतच्या कुंभारवाड्यांमधून आलेल्या खास गणेशमूर्ती मागविण्यात आल्या आहेत. आकर्षक रंगसंगती आणि सुबक कलाकुसर ही या मूर्तींची वैशिष्ट्ये आहेत. शाडू मातीच्या गणेशमूर्तींनाही यंदा चांगली मागणी आहे. पर्यावरणपूरक उत्सवाचा संदेश देणारे नागरिक शाडूच्या मूर्तींना पसंती देत आहेत. काही मूर्तींचे आगाऊ बुकिंगही सुरू झाले आहे.
यंदा विविध रूपांतील गणेशमूर्ती बाजारात पाहायला मिळत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वरूपातील मूर्ती विशेष आकर्षण ठरत आहेत. पेशवेकालीन वेशातील गणरायालाही मागणी आहे. श्रीरामाच्या रूपातील मूर्ती आणि बाल गणेशाच्या भावमुद्राही भाविकांना पसंत पडत आहेत. मूर्तींवरच आकर्षक कापडी पोशाख करण्यात आले आहेत. धोतर, शेला, उपरणे आणि जरीचे फेटे यांचा वापर करण्यात आला आहे.
काही मूर्तींवर रंगीबेरंगी पगडी आणि जिरेटोपही आहेत. त्यामुळे गणरायाचे रूप अधिक उठावदार दिसत आहे. गणेशमूर्तींसोबत सजावटीच्या साहित्याचीही बाजारपेठ फुलली आहे. तयार मखरांची विविध मॉडेल्स उपलब्ध आहेत. लाकूड आणि फायबरपासून तयार केलेली सिंहासनेही विक्रीसाठी आहेत. कृत्रिम फुले, कमानी आणि विविध सजावटीच्या वस्तूंनी दुकाने भरली आहेत. एलईडी माळांना विशेष मागणी आहे. विविध आकार आणि रंगांच्या विद्युत माळा बाजारात दाखल झाल्या आहेत.
यंदाच्या गणेशोत्सव बाजारपेठेतील आकर्षणे
कापडी पोशाखातील गणेशमूर्तींना पसंती मिळत आहे. शिवकालीन आणि पेशवेकालीन रूपातील मूर्ती लक्ष वेधत आहेत. बाल गणेशाच्या विविध भावमुद्रा उपलब्ध आहेत. पेणच्या गणेशमूर्तींची मागणी कायम आहे. शाडू मातीच्या मूर्तींना पर्यावरणप्रेमींचा प्रतिसाद मिळत आहे. तयार मखर, सिंहासने आणि एलईडी रोषणाईचे साहित्यही मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले आहे.
गणेशोत्सवाला अवघा आठवडा शिल्लक असतानाच बाजारपेठांमध्ये गर्दी वाढू लागली आहे. सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणेशोत्सवाची तयारीही वेगाने सुरू आहे. त्यामुळे उद्योगनगरीतील बाजारपेठांमध्ये सध्या गणेशोत्सवाचीच लगबग पाहायला मिळत आहे.






