Pimpri-Chinchwad : शहरात पाणी कपात अन् रस्ते धुण्याचा घाट; काळेवाडीत टँकरच्या पाण्याने बीआरटीची स्वच्छता
Pimpri-Chinchwad :

पिंपरी – राज्यात दुष्काळसदृश परिस्थितीचे सावट असताना आणि पिंपरी-चिंचवड शहरात पाणी कपात सुरू करण्यात आली आहे. असे असताना महापालिका प्रशासनाकडून पाण्याच्या वापराबाबत किती गांभीर्याने विचार केला जात आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. काळेवाडी परिसरात भर उन्हात पाण्याचे टँकर आणून बीआरटी मार्गावरील डिव्हायडर धुण्याचा प्रकार समोर आला आहे.
एकीकडे नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी होत असताना, दुसरीकडे डिव्हायडरच्या स्वच्छतेसाठी टँकरमधील पाण्याचा वापर केला जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
शहरातील विविध भागांमध्ये पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांकडून तक्रारी केल्या जात आहेत. काही भागांमध्ये पाण्याच्या वेळा, कमी दाबाने होणारा पुरवठा आणि उपलब्ध पाण्याचे नियोजन याबाबत नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरणे अपेक्षित आहे. पाणी बचतीबाबत जनजागृती करणाऱ्या महापालिका प्रशासनानेच पाण्याच्या वापरात अधिक दक्षता घेण्याची गरज आहे.
मात्र, काळेवाडीतील प्रकारामुळे प्रशासनाच्या प्राधान्यक्रमावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बीआरटी मार्गावरील डिव्हायडर स्वच्छ ठेवणे ही शहराच्या देखभालीच्या दृष्टीने आवश्यक बाब असली, तरी त्यासाठी पाण्याचा वापर करताना सध्याची परिस्थिती आणि पाण्याची उपलब्धता यांचा विचार होणे गरजेचे आहे.
नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले जात असताना महापालिकेच्या कामांमध्येही त्याच नियमांचे पालन होणे अपेक्षित आहे. पाणीटंचाईच्या काळात रस्ते, डिव्हायडर आणि अन्य सार्वजनिक ठिकाणांच्या स्वच्छतेसाठी पर्यायी व्यवस्था, पुनर्वापरयोग्य पाणी किंवा आवश्यकतेनुसार मर्यादित पाण्याचा वापर करण्याचे नियोजन करता येऊ शकते.
काळेवाडीतील या प्रकारामुळे नागरिकांच्या मनात संताप व्यक्त होत असून, पाण्याच्या वापराबाबत महापालिका प्रशासनाने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.





