Ganeshotsav 2023 : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विराजले श्रीराम मंदिरी

पुणे -“जय गणेश’, “मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया’, “जय श्रीराम’ असा जयघोषात श्री हनुमान रथातून निघालेल्या मिरवणुकीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशाची अयोध्येतील श्रीराम मंदिर प्रतिकृतीमध्ये प्रतिष्ठापना करण्यात आली. “राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’चे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते मंगळवारी सकाळी 10 वाजून 23 मिनिटांनी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.
प्रतिष्ठापनेपूर्वी ढोल-ताशांचा निनाद आणि बॅंडपथकातील कलाकारांनी वादन केलेल्या मधूर सुरावटींच्या साथीने गणपती मंदिरापासून सकाळी साडेआठ वाजता गणरायाच्या आगमन मिरवणुकीची सुरुवात झाली. दगडूशेठ गणरायाची विलोभनीय छबी आधीपासूनच भक्तांना आकर्षित करणारी आहे. उत्सवमंडपात निघालेल्या या गणरायाला डोळ्यांत साठवण्यासोबतच कॅमेरा आणि मोबाइलमध्ये गणरायाची छबी बंदिस्त करताना दर्शनासाठी गणेशभक्तांनी चौका-चौकांत गर्दी केली होती.
तांबडी जोगेश्वरी मंदिर, आप्पा बळवंत चौक, नगरकर तालीम चौक, शनिपार चौक, टिळक पुतळा, हुतात्मा बाबू गेनू चौकमार्गे मिरवणूक उत्सव मंडपात आली. मिरवणुकीमध्ये अग्रभागी देवळणकर बंधूंचा चौघडावादनाचा गाडा, गायकवाड बंधूंचा सनईवादनाचा गाडा, दरबार बॅंड, प्रभात बॅंड, मयूर बॅंडपथकांसह यासह “गंधाक्ष’ ढोल ताशा पथक सहभागी झाले होते.
ऋषिपंचमीनिमित्त आज 31 हजार महिलांचे अर्थवशीर्ष पठण, हरिजागर
ऋषिपंचमीनिमित्त बुधवारी (20 सप्टेंबर) उत्सव मंडपामध्ये पहाटे सहा वाजता 31 हजार महिला सामुहिक अर्थवशीर्ष पठण करणार आहेत. पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. रात्री 10 ते पहाटे तीन वाजेपर्यंत “हरी जागर’ च्या माध्यमातून महाराष्ट्रातील भारतीय वारकरी मंडळ आणि समस्त वारकरी बंधू वारकरी गजर करत गणरायाचरणी सेवा अर्पण करणार आहेत.
जगामध्ये शांती, सुबत्ता, परस्पर सौमनस्य नांदो. तसेच भारत हा सुख शांतीचा मार्ग दाखवणारा देश होवो. रोगमुक्त भारत होवो आणि हे सर्व संकल्प पुण्यापासून सर्व विश्वापर्यंत व्यापक होवो, अशी प्रार्थना गणरायाचरणी केली आहे. – डॉ. मोहन भागवत, सरसंघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ





