Ganeshotsav 2023: ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’ बाप्पांच्या चरणी अलोट गर्दी

पुणे – हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी रविवारी भाविकांनी अलोट गर्दी केली होती. सायंकाळच्या सुमारास तर अक्षरशः भाविकांचा पूरच आला होता.
प्रामुख्याने तालसम्राट पद्मश्री शिवमणीजी, ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक आणि संत तुकाराम महाराज यांचे वंशज डॉ. सदानंद मोरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, भाजप प्रवक्त्या चित्रा वाघ, आमदार रवींद्र धंगेकर, कॉंग्रेसचे नेते मोहन जोशी, गृह सहसचिव कैलास गायकवाड, पुणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, अभिनेत्री कायनात अरोरा, अभिनेता शिव ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी दर्शन घेतले. ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सव प्रमुख पुनीत बालन यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.
दरम्यान, सीमेवर लढताना अपंगत्व आलेल्या भारतमातेच्या सुपुत्रांच्या हस्ते रविवारी सकाळी श्रींची आरती करण्यात आली. त्यानंतर अध्यक्ष संजीव जावळे यांनी भारत मातेच्या सुपुत्रांना गौरविले. वंदेमातरम् संघटना कृत युवा वाद्य पथक, रूद्रांग वाद्य पथक, कलावंत वाद्य पथक, अभेद्य वाद्य पथक, शिवसाम्राज्य वाद्य पथक आणि शिववर्धन वाद्य पथक यांनी यावेळी एकत्रित वाद्यपूजन केले.
दरम्यान, कॉंग्रेसचे कसबा मतदार संघाचे आमदार रवींद्र धंगेकर, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी हे बाप्पांच्या दर्शनासाठी दाखल झाले. त्यांनी श्रींचे दर्शन घेतले. पुनीत बालन यांनी त्यांचा सन्मान केला. रात्री आठ वाजता महाआरतीस सुरुवात झाली. ज्येष्ठ विचारवंत सदानंद मोरे, कैलास गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांच्या हस्ते महाआरती आयोजित करण्यात आली. यावेळी अभिनेत्री कायनात अरोरा आणि अभिनेता शिव ठाकरे यांनी देखील बाप्पांचे दर्शन घेतले. रविवारी सकाळपासूनच श्रींचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी झुंबड उडाली होती.





