पुणे – राज्यभरात गेली दहा दिवस संपूर्ण भक्तीमय वातावरण, उत्साह निर्माण करणाऱ्या गणरायाला आज निरोप देण्यात येणार आहे. सकाळी 10:00 वाजल्यापासून शहरात विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली आहे. सर्वत्र जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आज सार्वजनिक आणि घरगुती गणपतींचे विसर्जन केले जाणार आहे.
त्यानुसार आता पुण्यातील मानाचे कसबा गणपती आणि तांबडी जोगेश्वरी यांच्या मिरवणुकीला सुरूवात झाली आहे. यावेळी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. पारंपरिक पालखीत दिमाखात तांबडी जोगेश्वरी गणपती मार्गस्थ झाली आहे. तर कसबा गणपतीची मिरवणूक बेलबाग चौकात पोहचली आहे. भाविक मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाले आहेत.
यंदा मात्र श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती यंदा साडेचार वाजता मिरवणुकीत सहभागी होणार आहे. पुण्यात पोलिसांचा देखील कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर आहे. लक्ष्मी रस्ता, कुमठकेर रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्ता या मार्गावरुन मिरवणूक जाणार आहे.
मुख्य विसर्जन मार्गासह उपनगरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहर तसेच उपनगरांत सुमारे नऊ हजार पोलिसांचा कडक बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.