विशेष : निर्माल्यापासून निर्मल

आज गणेश विसर्जन. लाडक्या बाप्पाला निरोप देताना “पुढच्या वर्षी लवकर या’, असे शब्द ओठांवर उमटतात. बाप्पाला निरोप देताना निर्माल्याकडेही ध्यान असू द्या.
भारत हा देश उत्सव प्रिय आहे. प्रत्येक धर्मात अनेक सणवार, धार्मिक कार्य व उत्सव असतात. या कार्यात देवी, देवतांना प्रसन्न करताना विविधतेने सजवलेले जाते. निर्माल्य मनोभावे वहात असतात. दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यात सोडून देतात अथवा कचराकुंडीत त्यांची जागा असते. असे निर्माल्य न फेकता ते संकलित करून त्यापासून कंपोस्ट खत तयार केले जाते. असे खत शेतीला व कुंडीतील झाडांना वापरले तर रासायनिक खतांपेक्षा कंपोस्ट खत हे अधिक प्रमाणात पर्यावरणपूरक आहे.
हिंदूधर्मात रीतीरिवाजाप्रमाणे प्रत्येक महिन्यात विविध धार्मिक कार्य, सणवार, यात्रा, उत्सव, व्रत, वैकल्य तसेच अनेक धार्मिक समारंभ असतात. या कार्यक्रमांच्या विसर्जनसमयी निर्माल्य नदी, तळी, तलाव, घाट, विहीर आदी नैसर्गिक जलस्रोतांत विसर्जित केले जातात. यामुळे नैसर्गिक स्रोतांच्या सौंदर्याला बाधा येते. यामुळे जलस्रोतातील जैवविविधता नष्ट होत चालल्याने पाणी दूषित होत चालले आहे. शहरी भागाबरोबर आता ग्रामीण भागाचे शहरीकरण होत चालले असून जलप्रदूषणाबाबत वारंवार जनजागृती करावी लागते. त्यामुळे निर्माल्य असो अथवा व्यक्ती मृत्यूपश्चात अस्थी विसर्जन असो जल प्रदूषणाचा प्रश्न हा शासनदरबारी नव्हे तर जाणिवेतून व स्वयंशिस्तीतूनच सुटेल.
आज गणपती बाप्पाचे विसर्जन आहे. त्या पाठोपाठ पितृपक्ष पंधरवडा, नवरात्र, दसरा, दीपावली, छटपूजा, होळी असे अनेक सणवार आहेत. त्यात पूजापाठासाठी पाने, फुले, फळे, पत्री, केळीचे खुंट, नारळाची पाने वापरतात नंतर यांचे विसर्जन जलस्रोतामध्ये होते. यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था व नगरपालिका यांनी याबाबत सक्तीने पावले उचलली पाहिजेत. असे निर्माल्य संकलित करून त्यापासून कंपोस्ट खत निर्मितीसाठी पर्यावरणप्रेमींना प्रोत्साहन दिले पाहिजे. अशा विसर्जित विघटन निर्माल्यातून गोळा झालेल्या वस्तूंचा खत निर्मितीसाठी उपयोग करून तर सजावटीत वापरलेली अविघटनशील वस्तू यात प्लॅस्टिक, कागदी पुट्ठे पुनर्प्रक्रियेसाठी वापरता येतात. याचे वर्गीकरण करून उपयुक्त वस्तू व खत निर्मिती होईल. हे खत शहरातील अनेक नागरिक कुंडीत फुलांची झाडे लावतात त्यांना अशा कंपोस्ट खतांचा वापर चांगल्या प्रकारे होतो. तर गावपातळीवर जमा झालेले कंपोस्ट खत गावातील, शाळेतील वृक्षांना अथवा अनेक नर्सरी वाले याची मागणी करतात. त्यातून थोडासा ग्राम विकासाला हातभारही लागतो. असे कंपोस्ट खत निर्मितीसाठी कृषी अधिकारी मार्गदर्शन करतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण असे निर्माल्य संकलित करून कंपोस्ट खत निर्मितीला प्रोत्साहन दिले पाहिजे.
अनेक पर्यावरणवादी संस्था पर्यावरणाच्या रक्षणासाठी हाक देत असतात. निर्माल्य जलाशयात टाकून देऊन पाण्याचे प्रदूषण करण्यापेक्षा संस्थेकडे दिल्यास खत निर्मितीसाठी वापरता येते. यात प्लॅस्टर ऑफ पॅरिस सारख्या वस्तू पाण्यात विरघळत नाहीत. शिवाय त्यांच्यापासून पुनर्प्रक्रिया होत नाही. यात अनेक मूर्ती या नदीतील पाणी ओसरल्यानंतर भग्न अवस्थेत दिसून येतात, हा एक प्रकारे धार्मिक अवमानही आहे. याची तमा बाळगली पाहिजे. पर्यावरणपूरक मूर्तींना नागरिकांनी प्राधान्य दिले पाहिजे. त्यामुळे विघटनास मदत होते. भव्यदिव्य मूर्ती स्थापना ही एक आता स्पर्धा झाली आहे. या स्पर्धेत मात्र पर्यावरण संवर्धन हा विषय बाजूला राहतो.
निर्माल्य टाकण्यासाठी प्रशासनाच्या वतीने निर्माल्य कलश नदीकाठी ठेवले जातात. अनेकदा ते पूर्ण भरलेले असतात अशावेळी नागरिक जलप्रवाहात निर्माल्य टाकतात. त्यामुळे योग्य व्यवस्थापनाकडे लक्ष पुरवले पाहिजे. अनेक शहरे ही स्वच्छ असण्यासाठी नियम व सुभाषिते लिहावी लागतात. स्वयंशिस्त नसल्याने असे नियम लिहावे लागतात. भारत भेटीस आलेल्या परदेशी पाहुण्यांना याबाबत संकोच वाटत असतो. कलशामध्ये निर्माल्य टाकतानासुद्धा विघटित, अविघटित असे वर्गीकरण करून टाकले पाहिजे. जेणेकरून समाजसेवी संस्थांना सहज वापरता येईल. धर्म, संस्कृतीबरोबर पर्यावरणाचे रक्षण हाती घेतले तर देश अधिक शोभून दिसेल.
प्रत्येक गाव, नगर, उपनगरमध्ये प्रत्येक धर्मांची प्रार्थनास्थळे असतात. वर्षभर अनेक धार्मिक कार्य, उत्सव, यात्रा असतात. मिरवणूक, पालखी या निमित्त सजावट मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे निर्माल्यही जास्त असते. नदी, तळी, तलाव, ओढे, नाले, विहीर आदी जलस्रोतांच्या ठिकाणी निर्माल्य बरोबर कुजणाऱ्या व न कुजणाऱ्या वस्तूंचेही विसर्जन केले जाते. असे निर्माल्य जमा करणारे अनेक भागांत निसर्गप्रेमी वर्ग आहेत. यांच्याकडून व्यवस्थापन व जनजागृतीचे काम केले जाते. सामाजिक कार्यकर्ते व महाविद्यालयीन मुले निसर्ग वाचवण्यासाठी पुढे येतात. परंतु यांना म्हणावा असा प्रतिसाद मिळत नाही.
जल, जंगल, जमीन, जनावर, त्यांना तारणारे पर्यावरण, याचे संरक्षण, संवर्धन आणि विकास लोकसहभागाने झाला पाहिजे. स्वच्छ भारत, समृद्ध भारत असा विचार जर देशभर कृतीतून पोहोचवायचा असेल तर स्वंय शिस्तीचा अंगीकार केला पाहिजे. अशा निर्माल्यातून निर्मल अर्थात कंपोस्ट खत उपयुक्त ठरत आहे.





