Rohit Tilak : पुण्यात गणेश विसर्जन उत्सवाचा जल्लोष! केसरीवाडा गणपतीचे अध्यक्ष रोहित टिळक म्हणाले “मंगलमय वातावरण…”

Rohit Tilak : पुण्यात मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. ढोल ताशांच्या गजरासह लाडक्या गणरायाची मिरवणूक वाजत गाजत शहरातून निघाली आहे. पुण्यातील मानाचा पाचवा गणपती केसरवाडा गणपतीच्या विसर्जन मिरवणूकीला सुरूवात झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणपती बाप्पांना पालखीत विराजमान करण्यात आलं आहे. या पालखीला झेंडूंच्या आकर्षक फुलांनी सजविण्यात आलं आहे.
महाराष्ट्र शासनाने गणेश उत्सवाला राज्य महोत्सव अशी मान्यता दिली आहे. त्यामुळे यंदा सर्वत्र जल्लोषाचं वातावरण आहे. सर्वत्र ढोल वादनाचा आवाज घुमत आहे. यासोबत गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर असा जयघोष केला जात आहे. यंदाच्या वर्षी गणेशउत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला असून लाखोंच्या संख्येने लोकं पुण्यात आली आहेत.
पुणे गणेश उत्सवाची ओळख आणी आपली संस्कृती आहे. लोकमान्य टिळकांनी गणेशउत्सवामागे जो दृष्टीकोन ठेवला होता. सगळ्यांना एकत्र करण्याचा, तो खूप चांगल्या पद्धतीने पार पडताना दिसत आहे. मंगलमय वातावरण असून खूप चांगल्या प्रकारचे देखावे तयार करण्यात आलेले आहेत, अशी प्रतिक्रिया केसरीवाडा गणपतीचे अध्यक्ष रोहित टिळक यांनी दिली.
विसर्जन मिरवणूक मानाच्या गणपतींची लवकर संपणार असल्याचं निश्चित करण्यात आलं आहे. यावर बोलताना कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला तर तो चांगला नसतो. मंडळांची संख्या सुद्धा वाढलेली आहे. त्यामुळे वेळ लागायचा. कुणीही मुद्दाम वेळ लावत नव्हते असं ते म्हणाले.
दीपक टिळकांची उणिव जाणवते
लोकमान्य टिळकांचे पणतू यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झालं होतं. त्यांची उणिव नक्कीच भासते. आमच्यासाठी धक्का आहे. ते मिरवणुकीत असायचे, आमचा आधार होते. म्हणून यंदाच्या वर्षी आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम केले नाहीत. त्यांनी आम्हाला सांगितल्यामुळे आम्ही ती प्रथा आणि परंपरा पुढे चालू ठेवण्याचं काम करतो, असं रोहित टिळक म्हणाले.





