Ganesh Visarjan 2024 । मानाच्या पाचव्या श्री केसरीवाडा गणपतीचे उत्साहपूर्ण वातावरणात विसर्जन

Ganesh Visarjan 2024 । पुण्यातील मानाच्या गणपती विसर्जनाला सुरुवात झाली आहे. यावेळी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. दरम्यान, पुण्यातील मानाच्या पाचव्या गणपतीचे म्हणजेच श्री केसरीवाडा गणपतीचे भक्तिमय वातावरणात विसर्जन झाले आहे. केसरीवाडा गणपतीचे ७ वाजून ३३ मिनिटांनी विसर्जन झाले. या विसर्जनानंतर पुण्याच्या पाचही मानाच्या गणपतींचे विसर्जन झाले आहे. दरम्यान , यंदा मानाच्या पाचही गणपती विसर्जन मिरवणुकीला तब्बल ८ तास लागले आहेत.
दरम्यान, महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानाच्या पाचव्या केसरीवाडा गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली. परंपरेप्रमाणे फुलांनी सजविलेल्या पालखीत गणराय विराजमान झाले होते.
श्रीराम, शिवमुद्रा, आवर्तन ढोल-ताशा पथकाने उत्कृष्ट वादन केले. तसेच बिडवे बंधुचा सनई-चौघडा मिरवणुकीत अग्रभागी राहिले. इतिहास अभ्यासक मोहन शेटे हे लोकमान्यांच्या वेशभूषेत सहभागी झाले होते.
विठ्ठलाची भव्य मूर्ती असलेला “माऊली’ रथ मिरवणुकीचे आकर्षण ठरला. विसर्जन मिरवणुकीत “केसरी’चे विश्वस्त-संपादक डॉ. दीपक टिळक, उत्सव प्रमुख डॉ. रोहित टिळक, डॉ. गीताली टिळक, डॉ. प्रणति रोहित टिळक, रौनक टिळक आदी सहभागी झाले होते.





