Ganesh Kale Murder : कोंढव्यातील खून टोळीयुद्धातून! बंडू आंदेकर सूत्रधार ; दोघांना अटक, दोन अल्पवयीन ताब्यात

प्रभात वृत्तसेवा
पुणे – कोंढव्यातील खडी मशिन चौकात भरदिवसा झालेल्या गोळीबारात रिक्षाचालक गणेश काळे याचा खून करण्यात आला. हा खून वनराज आंदेकरच्या खून प्रकरणाचा सूड म्हणून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर आणि त्याचा मुलगा कृष्णा आंदेकर यांनी यासाठी सूचनाही दिल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी दोन अल्पवयीनांसह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी कृष्णा आंदेकर (२८), बंडू आंदेकर (६९), स्वराज वाडेकर (२५, तिघे रा. डोके तालीम चौक, नाना पेठ), अमीर खान (२५), मयूर वाघमारे (२३), अमन मेहबूब शेख (२३, रा. काकडे वस्ती, कोंढवा), अरबाज अहमद पटेल (२४, रा. काकडे वस्ती, कोंढवा) यांच्यासह दोन अल्पवयीनांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी अमन शेख आणि अरबाज पटेल यांना अटक केली असून, दोघा अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले आहे. गणेश काळेचे वडील किसन धोंडिबा काळे (५१, रा. शिवकृपा बिल्डिंग, येवलेवाडी, कोंढवा) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.
मुख्य आरोपींची पार्श्वभूमी गुन्हेगारीची..
अमन शेख आणि अरबाज पटेल हे सराईत गुन्हेगार असून, त्यांच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे नोंद आहेत. अरबाजला काही वर्षांपूर्वी तडीपार करण्यात आले होते. २०२४ मध्ये त्याच्यावर झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायदा (एमपीडीए) अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर तो अकोला कारागृहातून बाहेर पडला. दरम्यान, मार्च २०२४ मध्ये तळेगाव दाभाडे येथे झालेल्या गोळीबारप्रकरणी अमन शेख आणि समर्थ तोरणे यांच्या ताब्यातून तीन पिस्तुले आणि चार काडतुसे जप्त करण्यात आली होती. गणेश काळे खून प्रकरणातील दोघा अल्पवयीनांवरही यापूर्वी गुन्हे नोंद आहेत.
सूडातून खून..
माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खून प्रकरणात गणेश काळेचा भाऊ समीर काळे याला अटक करण्यात आली होती आणि तो सध्या येरवडा कारागृहात आहे. त्या खटल्याचा सूड उगवण्यासाठीच हा खून केल्याची शक्यता तपासात व्यक्त करण्यात आली आहे. यापूर्वी आंदेकर टोळीने ६ सप्टेंबर रोजी नाना पेठेत गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकर याचा खून केला होता. त्यानंतर आंदेकरसह १६ जणांना अटक झाली होती. सध्या आंदेकर व त्याचे साथीदार न्यायालयीन कोठडीत आहेत.





