Ganesh Idol Price: पुणेकरांच्या खिशाला कात्री! यंदा लाडका गणपती बाप्पा २० ते २५ टक्क्यांनी महागणार
Ganesh Idol Price: गणेशोत्सवाला महिना उरल्याने पुण्यातील मूर्ती कारखान्यांमध्ये काम वेगाने सुरू; कच्च्या मालासह वाहतूक आणि मजुरीत वाढ झाल्याने गणेशमूर्ती महाग.

Ganesh Idol Price – लाडक्या गणरायाच्या आगमनाला अवघा महिना उरल्याने पुण्यातील पेठांसह उपनगरांमधील गणेशमूर्ती कारखान्यांमध्ये मूर्तिकारांची लगबग वाढली आहे. गणेशमूर्तींना अंतिम रूप देण्यासाठी कारागीर रात्रंदिवस काम करत आहेत. गेल्या दहा महिन्यांपासून सुरू असलेल्या कामाला आता वेग आला असून, यंदा कच्चा माल, रंग, थिनर, वीज, वाहतूक आणि कामगारांच्या मजुरीत वाढ झाल्याने गणेशमूर्तींच्या दरात मागील वर्षाच्या तुलनेत यंदा गणेशमूर्तींच्या किमतीत २० ते २५ टक्क्यांनी वाढ करावी लागल्याचे मूर्तिकारांचे म्हणणे आहे.
मानाच्या गणपतींच्या प्रतिकृतींना मागणी
गेल्या तीन-चार वर्षांत घरगुती गणेशोत्सवासाठी पुण्यातील मानाचे पाच गणपती, तसेच प्रमुख गणेश मंडळांच्या मूर्तींच्या प्रतिकृतींना मोठी मागणी आहे. पारंपरिक रेखीवपणा, प्रसन्न मुद्रा आणि पुण्याचा सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या मूर्तींना भाविकांची जास्त पसंती आहे. वाढती फ्लॅट संस्कृती आणि घरातील उपलब्ध जागेचा विचार करता एक ते दोन फूट उंचीच्या मूर्तींना सर्वाधिक मागणी असल्याचे मूर्तिकारांनी सांगितले.
कायमस्वरूपी मूर्तींना पसंती
गणेशोत्सवात पर्यावरण जनजागृतीही वाढताना दिसत आहे. दरवर्षी नवीन मूर्ती खरेदी करण्याऐवजी शाडू माती किंवा धातूची कायमस्वरूपी मूर्ती घरात ठेवण्याकडे काही भाविकांचा कल वाढला आहे. अशा मूर्तींचे दरवर्षी केवळ रंगकाम करून घेण्यासाठी भाविक मूर्तिकारांच्या कारखान्यांमध्ये येत आहेत. मूर्तींचे केवळ रंगकाम करून त्यांची पुन्हा प्रतिष्ठापना करण्याच्या पद्धतीमुळे मूर्तींची खरेदी कमी होण्याबरोबरच जलप्रदूषणही कमी होत आहे.
“गेल्या दहा महिन्यांपासून कारागीर सातत्याने काम करत आहेत. यंदा पेट्रोल- डिझेलच्या दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला आहे. मूर्तीसाठी लागणाऱ्या थिनरचे दर, विजेचे दर, रंगांच्या किमती आणि कामगारांचे मानधन वाढल्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा गणेशमूर्तींच्या दरात साधारण २० ते २५ टक्क्यांनी वाढ करावी लागली आहे.”
– श्रीकांत शिंदे, मूर्तिकार




