ganesh festival 2025 : गणेशोत्सवात फुलांच्या तुटवड्याची शक्यता; झेंडू २०० रुपयांपर्यंत जाणार
मुंबई – राज्यात मागील काही दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसाचा फुलांच्या शेतीवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. त्यामुळे दादर, नवी मुंबईसह ठाणे येथील प्रमुख फुलबाजारांत फुलांची आवक कमी झाली आहे. आवक कमी झाल्यामुळे बाजारपेठांमध्ये फुलांचा तुटवडा निर्माण झाला आहे. दरम्यान, मागील दोन दिवस दादर फुलबाजारात झेंडूची आवक अगदीच कमी झाली आहे. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर फुलांची आवक घडल्यामुळे बाजारपेठांमध्ये चिंतेचा सूर दिसत आहे.
याआधी साधारण प्रति किलो ८० ते १०० रुपये दराने फुलांची विक्री होत होती. मात्र, पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतांमध्ये पाणी साचल्याने झेंडू, मोगरा, गुलाब, चाफा यांसारख्या फुलांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. परिणामी, गणेशोत्सवाच्या काळात फुलांची मागणी वाढणार असली तरी आवक मात्र कमी राहील, असा अंदाज फुल विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे गणपतीत साधारण झेंडूचा प्रति किलो १६० ते २०० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, गणपतीत आरास आणि सजावटीसाठी मोठ्या प्रमाणात फुलांचा वापर होतो. घरगुती गणपतीसोबतच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या सजावटीसाठी झेंडू आणि इतर फुलांना मोठी मागणी असते. त्यामुळे भाव आणखी वाढण्याची शक्यता असून ग्राहकांना फुलांसाठी अधिक रक्कम खर्च करावी लागणार आहे, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. याचबरोबर दरवर्षी गणेशोत्सवाच्या आधी शेतकऱ्यांकडून बाजारात मोठ्या प्रमाणात फुलांची आवक होत असते. मात्र यंदा पावसामुळे परिस्थिती वेगळी असून विक्रेत्यांना फुलांचा तुटवडा भासणार आहे, असे फुल विक्रेते महेंद्र यादव यांनी सांगितले.





