“मोक्का” प्रकरणातील गायकवाड पिता-पुत्र जेरबंद

पुणे – पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांनी “मोक्का’अंतर्गत कारवाई केलेल्या गायकवाड पिता-पुत्रास बुधवारी पुणे पोलिसांनी कर्नाटकमधील उडपी येथून अटक केली. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
गणेश उर्फ केदार गायकवाड आणि नानासाहेब गायकवाड (रा. आयटीआय रोड औंध) अशी पिता-पुत्राची नावे आहेत. गणेश हा एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी होता. पक्षाने त्याची हकालपट्टी केली आहे. गणेश आणि नानासाहेब यांच्याविरुद्ध सुनेच्या छळ केल्याप्रकरणी चतुःशृंगी पोलिसांत गुन्हा दाखल आहे.
पिता-पुत्राने आर्थिक फायद्यासाठी पैसे देऊन, वसुलीसाठी गोळीबार, कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या होत्या. व्याजाच्या पैशांतूनच जागा, वाहने बळकावून संपत्ती जमविल्याचा पोलिसांना संशय होता. पोलिसांनी “मोक्का’अंतर्गत कारवाई केल्यानंतर काही तासातच गणेश आणि नानासाहेब गायकवाड यांच्या मुसक्या आवळल्या. सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई आणि पथकाने ही कारवाई केली आहे.





