Rajnath Singh : ‘गगनयान’ मोहिम एक नवीन अध्यायचे प्रतिक – राजनाथ सिंह
नवी दिल्ली – अंतराळाकडे केवळ संशोधनाचे क्षेत्र म्हणून पाहत नाही, तर उद्याच्या अर्थव्यवस्थेचे, सुरक्षेचे, उर्जेचे आणि मानवतेचे भविष्य म्हणून पाहतो आहे. आम्ही पृथ्वीच्या पलीकडे अंतराळाच्या नवीन सीमांपर्यंत सातत्याने प्रगती करत आहोत. आपण चंद्रापासून मंगळापर्यंत आपली उपस्थिती आधीच नोंदवली आहे आणि आज, देश गगनयानसारख्या मोहिमांसाठी पूर्णपणे सज्ज आहे. गगनयान मोहीम आत्मनिर्भर भारताच्या प्रवासातील नवीन अध्यायचे प्रतीक असल्याचे केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले.
नवी दिल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमात गगनयान या इस्रोच्या पहिल्या अंतराळ उड्डाण मोहिमेचा भाग असलेले ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला, ग्रुप कॅप्टन पी. बी. नायर, ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन आणि ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप यांचा राजनाथ सिंह यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.
राजनाथ सिंह म्हणाले, भारत आज जगातील आघाडीच्या अंतराळ शक्तींमध्ये अभिमानाने उभा आहे. आपला अंतराळ कार्यक्रम प्रयोगशाळा आणि प्रक्षेपण वाहनांपुरता मर्यादित नाही. तो आपल्या राष्ट्रीय आकांक्षा आणि जागतिक दृष्टिकोनाचे प्रतिबिंब आहे. चांद्रयानापासून ते मंगळयानापर्यंत आपण हे दाखवून दिले आहे की मर्यादित संसाधने असूनही, असीम इच्छाशक्तीमुळे सर्वात आव्हानात्मक उद्दिष्टे देखील उल्लेखनीय कामगिरीत रूपांतरित होऊ शकतात.
या अंतराळ तंत्रज्ञानाचा उपयोग आज देशातील प्रत्येक गाव आणि प्रत्येक शेतात सेवा पुरविण्यासाठी होत आहे. येत्या काळात अंतराळ खाणकाम, अंतराळात खोलवर संशोधन आणि ग्रहीय संसाधने मानवी संस्कृतीचा मार्गच बदलून टाकतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांचे यशस्वी अंतराळ मोहिमेबद्दल अभिनंदन करताना, सिंह यांनी त्यांच्या दृढनिश्चय व धैर्याचे कौतुक केले.
शुक्ल हे नागरी-सैन्य एकात्मतेचे प्रतिक आहेत. त्यांनी भारतीय हवाई दलाचा गणवेश परिधान केला असला तरी, त्यांचा अंतराळ प्रवास हा केवळ सशस्त्र सेना किंवा भारतापुरता मर्यादित नव्हता, तर संपूर्ण मानवजातीचे प्रतिनिधित्व करणारा होता. त्यांच्या या ऐतिहासिक मोहिमेतून नागरी क्षेत्राला दिलेले योगदान कायम इतिहासात नोंदले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.





