नगर,(प्रतिनिधी) – जिल्हा परिषदेच्या शाळेमधून परिपूर्ण विद्यार्थी घडतात. जिल्हा परिषद शाळा क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुणवत्ता या सर्वच बाबतीत अग्रेसर करण्याचा प्रयत्न आहे. सांस्कृतिक स्पर्धा उपक्रमातून विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळतो. विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत उस्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून शिक्षकांच्या पदोन्नतीचा एक हजाराचा टप्पा ओलांडला आहे. मिशन आपुलकीमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांना २६ कोटींचा निधी मिळालेला आहे. यावर्षी शिष्यवृत्तीसाठी तिसरी चौथी पासूनच सुरुवात करण्यात आलेली आहे. ३१ मार्च २०२४ पूर्वीच इयत्ता पहिलीचे प्रवेश निश्चित करून एक एप्रिल पासून वर्ग सुरू करण्यात येणार आहेत, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे प्रा.शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी केले. जिल्हा परिषद शाळातील विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा नगरमधील कल्याण रोडवरील जाधव मंगल कार्यालयात घेण्यात आली. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी शिक्षणाधिकारी बोलत होते. या वेळी उपशिक्षणाधिकारी मीना शिवगुंडे, लेखा अधिकारी रमेश कासार, विस्तार अधिकारी भाऊसाहेब साठे, जयश्री कार्ले, विलास साठे, भाऊसाहेब काळे, सुनील शिंदे, राजू शेलार, अश्फाक शेख, निर्मला साठे, गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड, महेश येनगंदुल, परिक्षक शर्मिला गोसावी, राम खुडे, दशरथ खोसे, प्राध्यापक सी. व्ही. जोशी , संतोष नगरकर , श्रीकांत ढगे,आदी उपस्थित होते. पाटील म्हणाले, केंद्र, तालुकास्तरावरील सांस्कृतिक स्पर्धांमधून उत्कृष्ट ठरलेल्या विद्यार्थ्यांना जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेत सहभागी करून घेण्यात आले आहे. यात पहिली ते चौथी आणि पाचवी ते आठवी अशा दोन गटातील विद्यार्थी सहभागी झाले आहेत. दोन्ही गटांचे प्रत्येकी चौदा असे एकूण २८ संघ स्पर्धेत सहभागी झाले आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कारासह विविध कलागुण सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. ग्रामीण भागात असलेली गुणवत्ता यानिमित्त सर्वांनी अनुभवली. उत्कृष्ट कार्यक्रमांना उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाट करून दाद दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री कार्ले, तर आभार रमेश कासार यांनी मानले.