Jammu and Kashmir: ऑक्टोबरपूर्वी जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा? रामदास आठवले नेमकं काय म्हणाले, पाहा…

Jammu and Kashmir | Ramdas Athawale – केंद्र सरकार यावर्षी ऑक्टोबरपूर्वी जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करण्याची घोषणा करू शकते. महाराष्ट्र, झारखंड आणि छत्तीसगडमध्ये ऑक्टोबरपूर्वी विधानसभा निवडणुका होणार आहेत.
अशा परिस्थितीत जम्मू-काश्मीर राज्याचा दर्जा बहाल केला जाऊ शकतो आणि विधानसभेच्या निवडणुकाही ऑक्टोबरमध्ये होऊ शकतात, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. त्यांच्या या विधानाकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.
श्रीनगरमध्ये लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्याशी झालेल्या अर्ध्या तासाच्या बैठकीत आठवले म्हणाले की, “कलम 370 हटवल्यानंतर राज्यात पर्यटनाचा विकास झाला आहे. परदेशी पर्यटकांसह 2.11 कोटीहून अधिक पर्यटकांनी येथे भेट दिली आहे. लोकांना आता काश्मीरमध्ये येण्याची भीती वाटत नाही. काही अप्रिय घटनांनंतर आता शांतता प्रस्थापित झाली आहे.
विधानसभेला 10 ते 15 उमेदवार । Jammu and Kashmir | Ramdas Athawale
आठवले म्हणाले की, त्यांचा पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीत किमान 10-15 उमेदवार उभे करेल. पाकव्याप्त काश्मीरमधून (पीओके) दहशतवादी पाकिस्तानच्या इशाऱ्यावर येथे घुसखोरी करतात.
मला वाटते की, पाकिस्तानने हे लक्षात ठेवले पाहिजे की त्याला प्रगती करायची असेल तर भारताशी चांगले संबंध ठेवावे लागतील. पाकिस्तानने दहशतवाद संपवावा, पीओके भारताकडे सोपवावा आणि पाकिस्तानच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी भारताचा पाठिंबा घ्यावा. हे पाकिस्तानला कधी समजेल, हे माहीत नाही.





