Top15: आज सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण ते जनगणनेच्या तारखा जाहीर! जाणून घ्या आजच्या TOP 15 News
Top15: राज्य, देश-विदेश, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील चालू घडामोडी...!

Top15: 1. नाशिकमध्ये आज सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण राष्ट्रपतींच्या हस्ते
आज शनिवारी 31 डिसेंबर रोजी होणाऱ्या नाशिकमधील रामकुंड येथे ध्वजारोहणाद्वारे कुंभमेळ्याच्या तयारीला आणि धार्मिक वातावरणाला विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळ्याचा आज औपचारिक प्रारंभ होणार आहे. आज दुपारी 12 वाजून 2 मिनिटांच्या मुहूर्तावर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचं ध्वजारोहण राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे. त्यासाठी नाशिकमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू, राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्यासह विविध आखाड्याच्या साधु-संत उपस्थित राहणार आहे.
2. महाराष्ट्रातील चारा परराज्यात पाठवण्यास बंदी; फडणवीस सरकारचा निर्णय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने पशुधनाच्या रक्षणासाठी मोठा निर्णय घेतला आहे. भीषण दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता, राज्यातील चारा परराज्यात पाठवण्यास कायदेशीर बंदी घालण्यात आली आहे. तसेच बायोफ्युएल किंवा वीजनिर्मितीसाठी चाऱ्याचा वापर करण्यास पूर्णपणे प्रतिबंध करण्यात आला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमिती आणि अभ्यासगटाच्या शिफारशींनुसार चाऱ्याचे खरेदी दर निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार, सुका चारा कमाल 12 रुपये प्रति किलो आणि मुरघास कमाल 8 रुपये प्रति किलो असेल. चारा टंचाईवर मात करण्यासाठी, काळाबाजार रोखण्यासाठी आणि चारा छावण्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने 30 ऑक्टोबर रोजी अधिकृत शासन निर्णय जारी करत व्यापक कृती आराखडा जाहीर केला आहे.
3. शिंदेंच्या कार्यक्रमाआधीच ठाकरे गटाने उरकला उद्घाटन सोहळा
नांदेडमधील वाडी येथील 100 खाटांच्या शासकीय रुग्णालयाच्या उद्घाटनावरून शिवसेना विरुद्ध शिवसेना असा राजकीय संघर्ष पाहायला मिळतोय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या रुग्णालयाचे अधिकृत लोकार्पण 1 नोव्हेंबरला होणार होते. मात्र, त्यापूर्वीच उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी नारळ फोडून या रुग्णालयाचे उद्घाटन केले आहे. वाडी येथील या शासकीय रुग्णालयासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निधी उपलब्ध करून दिला होता, तर भूमिपूजन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. मात्र, 1 नोव्हेंबरला होणाऱ्या लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रणपत्रिकेवर वाडीचे सरपंच आणि स्थानिक प्रतिष्ठित नागरिकांची नावे नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी होती.
4. मुसळधार पावसाचा अंदाज! महाराष्ट्रातील ६ जिल्ह्यांना अलर्ट
अनेक राज्यांमध्ये पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. आजही भारतीय हवामान विभागाने देशातील अनेक राज्यांना पावसाचा अलर्ट जारी केला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘अर्णब’ चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाल्यानंतरही महाराष्ट्रातील हवामानात बदल कायम आहे. वातावरणातील बदलांमुळे मध्य महाराष्ट्रात पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असून, आज काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या सहा जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर राज्यातील इतर भागांमध्ये आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
5. “भविष्यात काय होईल सांगता येत नाही” संजय राऊतांचे सूचक विधान
महाराष्ट्राच्या हास्यरेषा या प्रशांत कुलकर्णी संपादीत पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे एकत्र आले होते. यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी सूचक विधान केले आहे. काल उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र होते ना, हा ओलावा असतो. भविष्यात काय होईल सांगता येत नाही. लोकांचे मन चंचल आहे. लोकशाही म्हणजे बदल आणि परिवर्तन आहे. सत्तेवर कायम कुणी राहू शकत नाही असे संजय राऊत म्हणाले.
6. ऊसदराचा तिढा कायम; प्रकाश आबिटकरांचे १ ते २ दिवसांत तोडगा काढण्याचे आश्वासन
सध्या राज्यभरात ऊसदराचा मुद्दा चांगलाच तापला आहे. विविध ठिकाणी शेतकरी आणि शेतकरी संघटनांकडून ऊसदरासाठी आंदोलने केली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात गाळप हंगाम २०२६-२७ च्या अनुषंगाने पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘ऊसदर संवाद बैठक’ पार पडली.
या बैठकीत उसाचा रास्त व किफायतशीर दर आणि शेतकऱ्यांच्या अपेक्षित दरातील तफावतीवर सविस्तर चर्चा झाली. योग्य दर मिळेपर्यंत एक कांडीदेखील ऊस कारखान्यांना पुरवठा करणार नाही, असा आक्रमक पवित्रा शेतकरी संघटनांनी घेतला. दरम्यान, पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि जिल्हाधिकारी हे साखर कारखानदार तसेच शेतकरी संघटनांच्या नेत्यांशी स्वतंत्रपणे चर्चा करणार असून, येत्या एक ते दोन दिवसांत सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
7. कोल्हापुरात पाणी नियोजनाला वेग; शेतकऱ्यांसाठी हेल्पलाईन सुरू होणार – विखे पाटील
अल निनोच्या प्रभावामुळे यंदा कोल्हापूर जिल्ह्यात सरासरीच्या केवळ ५१.८३ टक्के पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे आगामी रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांमध्ये सध्या ९५ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असला, तरी तो पुढील जून-जुलैपर्यंत पुरवण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पाणी नियोजनासंदर्भात माहिती मिळावी आणि त्यांच्या तक्रारी नोंदवता याव्यात, यासाठी जलसंपदा विभागाच्या कार्यालयांमध्ये हेल्पलाईन सुरू करण्यात येणार आहे. तसेच दर दोन महिन्यांनी पाणी नियोजनाचा आढावा घेतला जाणार असल्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
8. निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचे प्रत्युत्तर; नारायण राणेंसोबतचा शेअर केला फोटो
पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी या पराभवाचे खापर शिवसेनेवर फोडले होते. त्यानंतर शिवसेना आमदार निलेश राणे यांनी “नवनाथ बन शिंदे साहेबांवर बोलताना लायकीत राहायचं. तुझी लायकी किती तू बोलतो किती” असे ट्विट यांनी केले होते. या ट्विटला नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर देत नारायण राणेंसोबतचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोसोबत ‘ज्युनिअर नवनाथ बन विथ सिनिअर लिडर नारायण राणे साहेब!’, अशी कॅप्शन लिहण्यात आली आहे. नवनाथ बन यांनी नारायण राणेंच्या बाजूला बसलेला फोटो शेअर करुन एकप्रकारे आपली उठबसही वरिष्ठ नेत्यांमध्ये असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.
9. पाण्याच्या प्रश्नावर तळोजावासीयांचा सिडकोवर हंडा मोर्चा
गेल्या अनेक वर्षांपासून अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या समस्येचा सामना करणाऱ्या तळोजा येथील रायगड इस्टेट सोसायटीच्या शेकडो रहिवाशांनी सिडकोविरोधात हंडा मोर्चा काढला. नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाण्यासारख्या मूलभूत सुविधेसाठी वारंवार संघर्ष करावा लागत असल्याने रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, परिसरातील शेजारील खासगी सोसायट्यांना नियमित पाणीपुरवठा केला जात असताना रायगड इस्टेट सोसायटीतील रहिवाशांना मात्र पाण्यापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यावेळी रहिवाशांनी हंडा मोर्चाच्या माध्यमातून सिडको प्रशासनाचा निषेध नोंदवला.
10. दिवाळीपूर्वीच आयुक्त तुकाराम मुंढे यांची धडक कारवाई
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खाद्यतेलाची मागणी वाढल्याने निकृष्ट तेलाच्या विक्रीला आळा घालण्यासाठी एफडीएने मोहीम हाती घेतली. त्यानुसार मुदतबाह्य, निकृष्ट आणि ग्राहकांनी नाकारलेले अन्नपदार्थ विल्हेवाटीच्या नावाखाली पुन्हा बाजारात विकणाऱ्या मोठ्या ‘सिंडिकेट’चा पर्दाफाश केला आहे. एफडीएने खाद्यतेलाच्या कारवाईत ८० परवाने रद्द केले. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई, ठाणे, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनग आणि पुणे येथे राबवलेल्या शोधमोहिमेत नामांकित कंपन्यांच्या गोदामांमध्ये हा गंभीर गैरप्रकार उघडकीस आला. तसेच ग्राहकांनी पॅकबंद अन्नपदार्थ खरेदी करताना मुदत, उत्पादन दिनांक आणि पॅकेजिंग तपासावे, असे आवाहन प्रशासनाने केले.
11. आरबीआयचा 10 आणि 20 रुपयांच्या नोटांबाबत मोठा निर्णय
भारतीय रिझर्व्ह बँक १० आणि २० रुपयांच्या पॉलिमर नोटांची चाचणी सुरू करण्याच्या तयारीत आहे. या नव्या नोटा सध्याच्या कागदी नोटांपेक्षा अधिक टिकाऊ असण्याची शक्यता आहे. नव्या नोटांचा आकार सध्याच्या नोटांसारखाच ठेवण्याचे नियोजन आहे. त्यामुळे बँकांना एटीएम मशीनमध्ये बदल करण्यासाठी मोठा खर्च करावा लागणार नाही.
मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार, या प्रकल्पाची सुरुवात १ एप्रिल २०२७ पासून होण्याची शक्यता आहे. पॉलिमर नोटा सामान्य कागदी नोटांपेक्षा दोन ते चार पट अधिक काळ टिकू शकतात. कागदी नोटा सततच्या वापरामुळे लवकर खराब होतात किंवा फाटतात. याउलट पॉलिमर नोटा अधिक काळ वापरता येऊ शकतात, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले होते.
12. जनगणनेच्या तारखा जाहीर! सरकार ऑनलाइन पोर्टल सुरू करणार
केंद्र सरकारकडून २०२७ च्या जनगणनेच्या तारखा देशभरात जाहीर करण्यात आल्या आहेत. सरकारने २५ जानेवारी २०२७ ते २८ फेब्रुवारी २०२७ या तारखा निश्चित करून जनगणनेची घोषणा केली आहे. जनगणनेसाठी संदर्भ तारीख १ मार्च २०२७ रोजी मध्यरात्री १२ वाजता निश्चित करण्यात आली आहे. अधिकृत अधिसूचनेनुसार, बर्फवृष्टी होणारा भाग आणि निवडणुका असलेल्या राज्यांव्यतिरिक्त देशाच्या उर्वरित भागात २५ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२७ दरम्यान जनगणना केली जाणार आहे.
मुख्य जनगणनेच्या कामापूर्वी सरकार लोकांना त्यांच्या तपशिलांची स्वयं-नोंदणी करण्याची परवानगी देणार आहे, ज्यासाठी ऑनलाइन पोर्टल 10 जानेवारी ते 24 जानेवारी 2027 पर्यंत खुले राहील. यानंतर, जनगणनेच्या माहितीचे अंतिम जुळवणी आणि दुरुस्ती करण्यासाठी 1 मार्च ते 5 मार्च 2027 दरम्यान एक पुनरावलोकन फेरी आयोजित केली जाईल.
13. अमेरिका, ब्रिटन, जपानसह युरोपीय देशातील नागरिकांना हाय अलर्ट
अमेरिका, ब्रिटन, जपान तसेच युरोपियन युनियनमधील देशांनी आपल्या नागरिकांना आणि सैन्याला कोणत्याही मोठ्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. रशियाकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता आणि जागतिक पायाभूत सुविधा ठप्प होण्याच्या भीतीपोटी ही पावले उचलली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. ब्रिटन सरकारने २२ ऑक्टोबरपासून अधिकृतपणे ‘बी रेडी’ मोहीम हाती घेतली आहे.
युद्ध, सायबर हल्ला किंवा नैसर्गिक आपत्तीच्या काळात मदत यंत्रणा पोहोचण्यास वेळ लागल्यास नागरिकांनी किमान ३ दिवस स्वतःचा बचाव करावा, असा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. नागरिकांना घरात अन्न, पाण्यासह आवश्यक वस्तूंचा साठा ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच आवश्यक औषधे आणि रोख रक्कम, महत्त्वाची ओळखपत्रे यांचाही यात समावेश आहे.
14. शुबमन गिलने डोळ्याच्या बाजूला लावलेलं डिव्हाइस काय आहे नेमकं?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेला ४ नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार आहे. त्यापूर्वी सरावादरम्यान शुबमन गिलने त्याच्या डोळ्याच्या बाजूला चिटकवलेल्या एका सोनेरी रंगाच्या अनोख्या उपकरणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हे खास फिटनेस डिव्हाइस टेम्पल असून ते सध्या क्रीडा आणि तंत्रज्ञान विश्वात प्रचंड चर्चेचा विषय ठरले आहे. हे डिव्हाइस फक्त डोळ्याच्या बाजूला चिकटवावे लागते, त्यानंतर ते आपल्या अत्याधुनिक सेन्सर्सच्या साहाय्याने खेळाडूची ऊर्जा, मानसिक ताण आणि शारीरिक आरोग्य ट्रॅक करते.
यात ‘ब्रेन फ्लो’ नावाचे विशेष फीचर आहे, जे मेंदूतील रक्ताभिसरण आणि सिग्नलचे विश्लेषण करते. हे उपकरण झोमॅटोचे सह-संस्थापक दीपिंदर गोयल यांच्या नव्या हेल्थ-टेक स्टार्टअपने विकसित केले आहे. सामान्य स्मार्टवॉच किंवा फिटनेस बँडच्या तुलनेत हे डिव्हाइस अत्यंत प्रगत असून थेट मेंदूतील जैविक हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. भारतीय बाजारात या प्रीमियम गॅझेटची किंमत ८४,९९९ रुपये ठेवण्यात आली असून, १ नोव्हेंबरपासून ग्राहकांसाठी याचे प्री-ऑर्डर बुकिंग सुरू होत आहे.
15. ‘महाराष्ट्र एपस्टिन फाईल’मध्ये मनोज जोशी साकारणार अशोक खरात…
महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडवणाऱ्या अशोक खरात प्रकरणावर आधारित या सिनेमातील भूमिकांबाबत गुप्तता पाळण्यात आली होती. पण अखेर बऱ्याच महत्त्वाच्या भूमिकांबाबत मेकर्सनी पोस्टर जाहीर करुन माहिती दिली आहे. यातच आता दिग्गज अभिनेते मनोज जोशी ‘महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स’ सिनेमात भोंदूबाबा अशोक खरात याची भूमिका साकारणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
राजकारण ढवळून काढणाऱ्या अशोक खरात प्रकरणावरच्या सिनेमात मनोज जोशी मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. ‘महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स’चा ट्रेलर पाहून त्यांची देहबोली अशोक खरातसारखीचअसल्याचं नेटकऱ्यांनी कमेंटमध्ये म्हटलंय. यानंतर आता या सिनेमाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.
Prakash Raj : राजकीय मुद्यांवर बोलणं पडलं महागात! प्रकाश राज यांच्या पत्नीचा मोठा खुलासा म्हणाल्या…





