Madhuri Dixit : फिट राहण्यासाठी माधुरी दीक्षित काय करते? डॉ. श्रीराम नेने यांनी सांगितला निरोगी आयुष्याचा खास फॉर्म्युला….
डॉ. नेने यांनी वडापाव आणि शिऱ्यासारख्या पदार्थांची उदाहरणे दिली आहेत. पदार्थ बनवताना काही घटकांमध्ये बदल करून त्याला अधिक आरोग्यदायी बनवण्याचा प्रयत्न करता येतो.

Madhuri Dixit : फिट राहायचंय, वजन नियंत्रणात ठेवायचंय आणि आजारांपासून दूर राहायचंय? मग त्यासाठी महागड्या जिमची फी, कठीण डाएट किंवा तासनतास घाम गाळण्याची गरज नाही! बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित आजही आपल्या फिटनेस आणि सौंदर्याने चाहत्यांना भुरळ घालते.
तिच्या फिटनेसचं रहस्य नेमकं काय? याबाबत तिचे पती आणि प्रसिद्ध हृदयविकारतज्ज्ञ डॉ. श्रीराम नेने यांनी काही महत्त्वाच्या सवयी सांगितल्या आहेत. विशेष म्हणजे, या सवयी आपल्या रोजच्या जीवनात सहजपणे अंगीकारता येऊ शकतात.
१. आहारात योग्य पदार्थांचा समावेश करा :
निरोगी शरीरासाठी योग्य आणि संतुलित आहार हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. शरीराला आवश्यक असणारी ऊर्जा आणि पोषक तत्त्वे मिळण्यासाठी आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे, फायबरयुक्त पदार्थ, प्रथिने आणि योग्य प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असणे गरजेचे आहे.
डॉ. नेने यांच्या मते, केवळ काय खातो यापेक्षा किती खातो, याकडेही लक्ष देणे महत्त्वाचे आहे. एकाच वेळी भरपूर खाण्याऐवजी योग्य प्रमाणात आणि नियमित वेळेत जेवण करावे. तसेच, दिवसभर काय खायचे याचे आधीच नियोजन केल्यास अनावश्यक खाणे टाळता येते.
२. जेवणानंतर करा थोडे चालणे :
जेवण झाल्यानंतर लगेच सोफ्यावर बसणे किंवा झोपणे ही अनेकांची सवय असते. मात्र, जेवणानंतर थोडा वेळ हलक्या गतीने चालणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
डॉ. नेने यांनी जेवणानंतर चालण्याच्या सवयीवर विशेष भर दिला आहे. जेवणानंतर हलकी शारीरिक हालचाल केल्याने स्नायू सक्रिय होतात आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते.
३. वाढत्या वयात स्नायू मजबूत ठेवण्यासाठी करा साधे व्यायाम :
वाढत्या वयासोबत शरीरातील स्नायूंची ताकद कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे दैनंदिन कामे सहज करण्यासाठी आणि शरीराची क्षमता टिकवून ठेवण्यासाठी स्नायू मजबूत असणे आवश्यक आहे.
यासाठी प्रत्येक वेळी जिममध्ये जाऊन जड वजन उचलण्याची गरज नाही. घरातील हलक्या वस्तूंचा वापर करूनही स्नायूंना व्यायाम देता येतो. खुर्चीवरून उठणे-बसणे, हलके वजन उचलणे किंवा शरीराच्या क्षमतेनुसार सोपे व्यायाम करणे असे पर्याय निवडता येतात.
४. झोपण्याची वेळ ठरवा :
डॉ. नेने यांच्या मते, दररोज ठरावीक वेळी झोपणे आणि सकाळी ठरावीक वेळी उठणे ही सवय लावणे आवश्यक आहे. झोपण्यापूर्वी मोबाइलचा वापर कमी करावा, खोलीतील प्रकाश मंद ठेवावा आणि शांत वातावरणात झोपण्याचा प्रयत्न करावा.
नियमित झोपेचे वेळापत्रक पाळल्याने झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत मोबाइल पाहण्याची सवय असेल, तर ती बदलण्याचा प्रयत्न करा.
५. सोशल मीडियावरील प्रत्येक हेल्थ ट्रेंडवर विश्वास ठेवू नका!
आजकाल सोशल मीडियावर वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे डाएट, डिटॉक्स ड्रिंक्स आणि फिटनेसचे नवनवीन ट्रेंड व्हायरल होत असतात. काही दिवसांत वजन कमी करण्याचे दावेही केले जातात. मात्र, प्रत्येक ट्रेंड आपल्या शरीरासाठी योग्य असेलच असे नाही.
डॉ. नेने यांनी अशा ट्रेंड्सबाबत सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. कोणताही नवीन डाएट किंवा आरोग्यविषयक प्रयोग करण्यापूर्वी त्यामागील वैज्ञानिक आधार तपासणे महत्त्वाचे आहे.
६. आवडते पदार्थ खा; पण खाण्याच्या प्रमाणावर ठेवा नियंत्रण
निरोगी राहायचे म्हणजे आवडते पदार्थ कायमचे सोडून द्यायचे, असा अनेकांचा समज असतो. मात्र, योग्य प्रमाणात आणि संतुलित आहाराचा भाग म्हणून आवडते पदार्थ खाणे शक्य आहे.
डॉ. नेने यांनी वडापाव आणि शिऱ्यासारख्या पदार्थांची उदाहरणे दिली आहेत. पदार्थ बनवताना काही घटकांमध्ये बदल करून त्याला अधिक आरोग्यदायी बनवण्याचा प्रयत्न करता येतो. उदाहरणार्थ, काही पदार्थांमध्ये बटाट्याऐवजी रताळ्याचा वापर करता येऊ शकतो.








