Top 10 News : देशावर दुहेरी संकट ते कोस्टल रोडवर भीषण अपघात..; वाचा आजच्या टॉप दहा बातम्या
Top 10 News : देशावर दुहेरी संकट ते कोस्टल रोडवर भीषण अपघात..; वाचा आजच्या टॉप दहा बातम्या

Top 10 News : 1) देशावर दुहेरी संकट! महाराष्ट्रात मेघगर्जनेसह वादळी वाऱ्याचा इशारा
देशातील काही भागांमध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, त्यासोबतच मेघगर्जना आणि वादळी वाऱ्याचा धोका निर्माण झालाय. भारतीय हवामान विभागाच्या ताज्या माहितीनुसार, विविध राज्यांमध्ये पुढील काही दिवसांत पाऊस आणि वादळी हवामानाची शक्यता आहे. महाराष्ट्रातही काही भागांत मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा अंदाज आहे. विदर्भात २० आणि २१ सप्टेंबरला मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील नागरिकांनी स्थानिक हवामान अंदाजावर लक्ष ठेवावे. मुसळधार पावसाच्या वेळी नदी, नाले आणि सखल भागात जाणे टाळण्याचा सल्ला देण्यात येतो. (Top 10 News)
2) काजू-बदाम वादानंतर अकोल्यातही जनतेची थट्टा
राज्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकरी संकटात असताना दुष्काळ आढावा बैठकीतील काही दृश्यांवरून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. नांदेडमधील दुष्काळ आढावा बैठकीत काजू-बदामाच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर आता अकोल्यातील अमरावती विभागीय आढावा बैठकीचा प्रकार चर्चेत आलाय. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ही बैठक झाली. या बैठकीत काही अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त असल्याचे दृश्य समोर आल्याचा दावा करण्यात आलाय. काही जण व्हॉट्सअॅप, तर काही जण फेसबुक पाहत असल्याचे सांगितले जात आहे. एकीकडे शेतकरी दुष्काळ, पिकांचे नुकसान आणि मदतीच्या प्रतीक्षेत असताना बैठकीतील या प्रकारामुळे प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. (Top 10 News)
3) रात्रीच्या अंधारात महामार्गावर ६ तास थरार!
पुणे अन्न व औषध प्रशासनाने प्रतिबंधित गुटख्याच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई केलीय. मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात विक्रीसाठी आणला जात असलेला गुटखा आणि पानमसाला घेऊन जाणाऱ्या ट्रकचा FDAच्या पथकाने तब्बल सहा तास पाठलाग केला. १८ सप्टेंबर रोजी संगमनेरपासून राजगुरुनगर टोलनाक्यापर्यंत झालेल्या या कारवाईत ट्रक अखेर ताब्यात घेण्यात आला. ट्रकमधून गुटखा, पानमसाला आणि वाहन असा एकूण १ कोटी १३ लाख ५४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी चालकासह संबंधित पुरवठादार, वाहन मालक आणि वाहतूकदारांविरोधात चाकण उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. हा प्रकार संघटित गुन्हेगारीशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त करत आरोपींवर MCOCA (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्याची शिफारस FDAने पोलिसांकडे केलीय.
4) कोस्टल रोडवर BMWचा भीषण अपघात!
मुंबईतील कोस्टल रोडवर रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास भीषण अपघात झाला. गुजरातच्या अहमदाबाद येथून मुंबईत उच्च शिक्षणासाठी आलेल्या चार तरुणांची BMW कार मरीन ड्राईव्हवरून हाजी अलीच्या दिशेने जात होती. लाला कॉलेजसमोर आणि लोटस जेट्टीजवळ अतिवेगामुळे चालकाचा ताबा सुटल्याने कार पुलाचा कठडा तोडून तब्बल ५० फूट खाली कोसळली. अपघातात कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. नायर रुग्णालयाच्या माहितीनुसार, शानय गज्जल, धिर्या सेठ आणि आणखी एका तरुणाचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी आहे. मृतांमध्ये आर्किटेक्चर आणि इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचा समावेश असल्याचे सांगितले जातेय. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून, अतिवेगामुळे अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (Top 10 News)
5) १५ कोटींच्या रस्ते कामावरून राजकारण तापलं
धुळे शहरातील महात्मा गांधी पुतळ्यापासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत सुरू असलेल्या तब्बल १५ कोटी रुपयांच्या रस्ते कामावरून राजकारण तापलंय. शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी या कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर आरोप करत चौकशीची मागणी केलीय. आरसीसी गटार बांधकामाची आवश्यकता नसतानाही जुन्या गटारीवरच काम सुरू असल्याचा दावा करण्यात आलाय. तसेच कामाच्या ठिकाणी फलक नसणे, पर्यवेक्षक उपलब्ध नसणे आणि अंदाजपत्रकातील तरतुदींनुसार खोदाई व पीसीसी न करताच काम सुरू असल्याचा आरोपही करण्यात आला. नागरिकांच्या तक्रारीनंतर पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. या संपूर्ण १५ कोटींच्या कामाची विभागीय अधिकाऱ्यांकडून चौकशी करून गुणवत्ता तपासावी, ठेकेदाराची देयके थांबवावीत आणि दोषी आढळल्यास कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आलीय. तसेच कार्यकारी अभियंता आर. आर. पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आलीय. (Top 10 News)
6) गणेशोत्सव मंडळाला पोलिसांची धमकी? संजय राऊतांचं पोलिस आयुक्तांना पत्र
मुंबईतील गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिस अधिकाऱ्याकडून धमकावल्याचा आरोप समोर आलाय. या प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहून निष्पक्ष चौकशीची मागणी केलीय. कुलाब्यातील बालगोपाल मित्र सार्वजनिक उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आपली भेट घेऊन संबंधित पोलिस अधिकाऱ्याविरोधात तक्रार केल्याचा दावा राऊत यांनी केलाय. महापालिकेची वैध परवानगी असतानाही डीसीपी ट्रॅफिक साऊथ झोन हेमराज राजपूत यांनी धमकीवजा भाषेत संवाद साधल्याचा आरोप करण्यात आलाय. तसेच उपस्थित महिलांशी असभ्य वर्तन करून त्यांचे मोबाईल फोन घेतल्याचाही आरोप आहे. या घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण झाल्याचे राऊत यांनी पत्रात नमूद केले आहे. मंडळाने महापालिका निवडणुकीत मकरंद नाईक यांना समर्थन न दिल्यामुळे हा प्रकार घडल्याचा आरोपही करण्यात आलाय.
7) चांदवडमध्ये गांजाच्या अवैध विक्रीवर पोलिसांचा छापा!
चांदवड शहरातील लेंडी हट्टी परिसरात गांजाच्या कथित अवैध विक्रीविरोधात पोलिसांनी धडक कारवाई केलीय. गोपनीय माहितीच्या आधारे १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी पोलिसांनी एका घरावर छापा टाकला. या कारवाईत जमना समाधान माळी या महिलेच्या ताब्यातून १ किलो ४९२ ग्रॅम गांजा आणि १ लाख २२ हजार ५३ रुपये रोकड जप्त करण्यात आली. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख ५१ हजार ८९३ रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी पोलीस अंमलदार प्रदीप आजगे यांच्या फिर्यादीवरून अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, महिला आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. नव्याने रुजू झालेले चांदवड पोलीस ठाण्याचे निरीक्षक अभिजीत सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध धंद्यांविरोधात पोलिसांची मोहीम अधिक तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत. (Top 10 News)
8) नागपुरात देशातील सर्वात मोठी सोलर मॉड्यूल फॅक्टरी!
नागपूरच्या ॲडिशनल बुटीबोरी एमआयडीसीमध्ये देशातील सर्वात मोठ्या सोलर मॉड्यूल उत्पादन प्रकल्पांपैकी एक असलेली AVAADAची सुपर फॅक्टरी उभारण्यात आलीय. या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात आणि स्वयंचलित पद्धतीने सोलर मॉड्यूल्सचे उत्पादन होत आहे. या फॅक्टरीमध्ये सध्या जवळपास ४ हजार लोक काम करत असल्याची माहिती देण्यात आलीय. प्रकल्पाची उत्पादन क्षमता पुढे ७ गिगावॅटपर्यंत वाढवण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले. ॲडिशनल बुटीबोरी परिसरात आणखी चार सोलर मॉड्यूल कंपन्या आल्याने औद्योगिक विस्ताराला वेग मिळाला आहे. परिसरातील जागा उद्योजकांनी घेतल्याने आणखी एका ॲडिशनल बुटीबोरी एमआयडीसीची उभारणी करण्याची तयारी सुरू असल्याचे सांगण्यात आले. तसेच महिंद्राला १ हजार एकर जमीन देण्यात आली असून, पुढील काही महिन्यांत प्लांटच्या कामाला सुरुवात होण्याची माहिती देण्यात आली. यामुळे नागपूर आणि विदर्भात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जातेय.
9) कोरड्या दुष्काळावरून ठाकरे गट आक्रमक!
सोलापूर जिल्ह्यातील कोरड्या दुष्काळाच्या प्रश्नावरून शिवसेना ठाकरे गट आक्रमक झालाय. राज्य सरकारच्या विरोधात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी करत विविध मागण्यांचे बॅनर झळकावून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, ही आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेल्या अडचणींकडे सरकारने तातडीने लक्ष द्यावे आणि आवश्यक मदत जाहीर करावी, अशी मागणीही करण्यात आली. नांदेडमधील दुष्काळी बैठकीत चर्चेत आलेल्या काजू-बदामाच्या मुद्द्यावरून आंदोलकांनी सरकारवर टीका केली. (Top 10 News)
10) पंतप्रधान होणार की मुख्यमंत्रीच राहणार? योगी आदित्यनाथ यांनी दिलं थेट उत्तर
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भविष्यातील राजकीय भूमिकेबाबत सुरू असलेल्या चर्चांना त्यांच्या ताज्या मुलाखतीमुळे नवा संदर्भ मिळालाय. द स्टेट्समनला दिलेल्या मुलाखतीत त्यांना २०२७ नंतर पंतप्रधानपदाच्या शर्यतीत स्वतःला पाहता का, असा थेट प्रश्न विचारण्यात आला. यावर योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने आपल्यावर उत्तर प्रदेशातील जनतेची सेवा करण्याची जबाबदारी सोपवली असून, आपला पूर्ण भर राज्याला आर्थिक, सामाजिक आणि प्रशासकीयदृष्ट्या पुढे नेण्यावर असल्याचे सांगितले. २०२७च्या विधानसभा निवडणुकीतील जागावाटप हा पक्ष संघटनेचा विषय असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पंतप्रधानपदाबाबत सुरू असलेल्या चर्चांमध्ये त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. दरम्यान, अयोध्येचा विकास, वैद्यकीय शिक्षण आणि रोजगारनिर्मितीबाबतही त्यांनी सरकारच्या कामगिरीचा उल्लेख केला.
11) सौदीच्या मदतीला आलात तर लोखंडी हाताने ठेचू; हुथींची पाकिस्तान-तुर्कीला थेट धमकी
पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर येमेनमधील हुथी गटाकडून पाकिस्तान आणि तुर्कीला थेट इशारा देण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय. सौदी अरेबियाच्या मदतीसाठी या दोन्ही देशांनी थेट लष्करी हस्तक्षेप केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी हुथी वरिष्ठ अधिकारी मोहम्मद अल-बुखैती यांनी दिल्याचे वृत्त आहे. ऑगस्ट २०२६ मध्ये सौदी अरेबिया, पाकिस्तान आणि तुर्कीने मक्का संयुक्त संरक्षण करारावर स्वाक्षरी केली होती. या करारानुसार एका देशावर झालेला सशस्त्र हल्ला तिन्ही देशांवरील हल्ला मानला जाऊ शकतो. दरम्यान, तुर्कीने सौदीच्या लष्करी गरजांना मदत करण्याची तयारी दर्शवली आहे, तर पाकिस्तानने सध्या थेट लष्करी कारवाईची योजना नसल्याचे स्पष्ट केलेय. (Top 10 News)
12) एकाच फोनमध्ये तीन WhatsApp चालणार
iPhone वापरणाऱ्यांसाठी WhatsApp कडून मोठी अपडेट समोर आलीय. एका फोनमध्ये एकापेक्षा जास्त WhatsApp अकाउंट वापरण्याची सुविधा आता आणखी विस्तारली जाणार असल्याची माहिती आहे. सध्या iPhone वर दोन WhatsApp अकाउंट वापरण्याची सुविधा उपलब्ध झाली असून, आता तिसरं अकाउंट जोडण्याची तयारी सुरू असल्याचं सांगितलं जातंय. हे फीचर उपलब्ध झाल्यास Personal, Office आणि Business अशा तीन वेगवेगळ्या नंबरचे WhatsApp अकाउंट एकाच फोनमध्ये वापरता येऊ शकतील. अकाउंट बदलण्यासाठी WhatsApp च्या Settings मधील Account List मधून संबंधित अकाउंट निवडता येईल. विशेष म्हणजे प्रत्येक अकाउंटची चॅट, मीडिया, नोटिफिकेशन, बॅकअप आणि Privacy Settings स्वतंत्र राहतील. त्यामुळे अनेक नंबर वापरणाऱ्या iPhone युजर्ससाठी हे फीचर फायदेशीर ठरू शकतं.
13) २०२७ Kawasaki Vulcan S ची भारतात दमदार एन्ट्री
कावासाकीने आपली लोकप्रिय क्रूझर बाईक २०२७ Kawasaki Vulcan S भारतीय बाजारात लॉन्च केलीय. या बाईकची एक्स-शोरूम किंमत ₹८.२३ लाख असून, मागील मॉडेलच्या तुलनेत किंचित वाढ झालीय. बाईकमध्ये ६४९ सीसी पॅरालेल-ट्विन इंजिन देण्यात आलं असून, कमाल पॉवर ६१ बीएचपी आहे. अपडेटेड मॉडेलमध्ये टॉर्क ६२.४ एनएमपर्यंत वाढवण्यात आलाय. लूकमध्येही बदल करण्यात आले असून ‘मेटॅलिक कार्बन ग्रे’ हा नवीन रंग देण्यात आलाय. ब्रेकिंगसाठी ड्युअल-चॅनेल ABS मिळते. सीटची उंची ७०५ मिमी असून बाईकचं वजन २३५ किलो आहे. या सेगमेंटमध्ये Royal Enfield Super Meteor 650 हा तुलनेने कमी किमतीचा पर्याय आहे. (Top 10 News)
14) पुरुषांनाही मासिक पाळी यावी…
बॉलिवूड अभिनेत्री श्रुती हासन सध्या तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आलीय. सोहा अली खानच्या पॉडकास्टवरील चर्चेदरम्यान श्रुतीने मासिक पाळी आणि त्यावेळी होणाऱ्या वेदनांबाबत मोकळेपणाने भाष्य केले. पुरुषांनाही मासिक पाळी यावी, अशी मी हजारो वेळा प्रार्थना केली आहे, असे ती म्हणाली. मासिक पाळीच्या वेदनांकडे अनेकदा गांभीर्याने पाहिले जात नाही, असे सांगत कामाच्या करारांमध्ये ‘पीरियड लीव्ह’चा समावेश असावा, अशी भूमिका तिने मांडली. श्रुतीने स्वतःला PCOSचा त्रास असल्याने मासिक पाळीदरम्यान तीव्र वेदना होत असल्याचेही सांगितले. करिअरच्या सुरुवातीला या विषयावर बोलण्यास संकोच वाटत होता, मात्र शारीरिक आरोग्याबाबत मोकळेपणाने संवाद साधल्याने कामाचे नियोजन आणि परस्पर समजूत वाढू शकते, असा अनुभव तिने सांगितला.
15) आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीत भारताची दुहेरी चांदी
जपानमधील नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताने नेमबाजीत दमदार कामगिरी करत दोन रौप्यपदके पटकावली आहेत. महिलांच्या १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात सोनम मस्कर, एलावेनिल वलारिवन आणि विदार्स विनोद यांच्या संघाने १८९८.० गुणांसह भारताचे पदकांचे खाते उघडले. त्यानंतर वैयक्तिक प्रकारात भारताची स्टार नेमबाज एलावेनिल वलारिवनने २५२.४ गुणांची कमाई करत दुसरे रौप्यपदक जिंकले. शेवटच्या दोन शॉट्सपर्यंत ती सुवर्णपदकाच्या शर्यतीत आघाडीवर होती; मात्र जपानच्या ताइचीने अखेरच्या क्षणी बाजी मारली. भारताचे हे स्पर्धेतील दुसरे अधिकृत रौप्य ठरले. (Top 10 News)




