Top 15 News: मनोज जरांगेंचे उपोषण स्थगित, राज्यात उकाडा वाढला आणि प्रीती झिंटा, पंकज त्रिपाठींसह नव्या सदस्यांची सेन्सॉर बोर्डात एन्ट्री, वाचा टॉप १५ बातम्या
Top 15 News:

मनोज जरांगेंचे उपोषण स्थगित;
सरकारला तीन महिन्यांची मुदत
Top 15 News: जालना येथील अंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेने निघालेले मनोज जरांगे यांची बीडमधील पाटोदा याठिकाणी सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. चर्चेनंतर जरांगेंनी सरकारला तीन महिन्यांची मुदत देत उपोषण स्थगित केले; मात्र आंदोलन सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले. सातारा, कोल्हापूर, पुणे आणि औंध गॅझेटियर तीन महिन्यांत लागू करण्याचे, तसेच हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्रांसाठी सुधारित जीआर काढण्याचे आश्वासन सरकारने दिले. शिंदे समितीने शोधलेल्या ५८ लाख नोंदी कमी न करण्याची हमी आणि मराठवाड्यातील चार लोकप्रतिनिधींची रद्द कुणबी प्रमाणपत्रे वैध करण्याचेही सरकारने मान्य केल्याचे जरांगे यांनी सांगितले. मुंबईत गेलेल्या समर्थकांनी तातडीने माघारी यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
राज्यात उकाडा वाढला;
९ जिल्ह्यांत विजांसह पावसाचा अंदाज
पावसाने उघडीप दिल्याने राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला आहे. मात्र, हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज दिला आहे. अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर आणि नांदेडमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. इतर भागांत ढगाळ वातावरणासह हलक्या सरी पडू शकतात. सोलापूरमध्ये ३६.४ अंश सेल्सिअस राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. तर श्रीवर्धन येथे ५० मिमी पाऊस झाला. उत्तर अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे.
खासगी रुग्णालयांच्या नफेखोरीचा पर्दाफाश;
११ रुपयांचा सलाईन सेट ३२५ रुपयांना!
FDAच्या सर्वेक्षणात खासगी रुग्णालयांकडून वैद्यकीय उपकरणांसाठी आकारल्या जाणाऱ्या किमतींमध्ये मोठी तफावत आढळली आहे. रुग्णालये सलाईन सेट ११.०५ रुपयांना खरेदी करून रुग्णांकडून ३२५ रुपये आकारत असल्याचे समोर आले. तसेच ६.७५ रुपयांची सीरिंज ५७.२० रुपये, तर २९.१४ रुपयांचा कॅथेटर ३१० रुपयांना विकला जात असल्याचे आढळले. ऑक्सिजन मास्क आणि नेब्युलायझरसह इतर उपकरणांच्या किमतीतही मोठी तफावत आहे. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या प्रकरणी NPPA आणि केंद्राच्या औषध विभागाला पत्र लिहून वैद्यकीय उपकरणांच्या ट्रेड मार्जिनवर कठोर मर्यादा घालण्याची मागणी केली आहे.
बीड-पुणे रेल्वेसेवेचा श्रीगणेशा; प्रवाशांना मोठा दिलासा
पुणे आणि बीडकरांसाठी गणेशोत्सवात आनंदाची बातमी आहे. बीड आणि पुणे दरम्यान पहिली दैनंदिन रेल्वे सेवा सुरू करण्यात येणार आहे. १७ सप्टेंबरला बीड स्थानकावरून विशेष गाडीला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. ही गाडी अमळनेर भांड्याचे, नवीन आष्टी, नारायणडोह, अहिल्यानगर, श्रीगोंदा रोड, दौंड कॉर्ड लाईन आणि उरुळी या सात स्थानकांवर थांबणार आहे. गाडीत वातानुकूलित डबे, शयनयान आणि सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असतील. या रेल्वेमुळे विद्यार्थी, व्यापारी, रुग्ण आणि भाविकांना पुणे गाठणे सोपे होणार आहे. अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ रेल्वे प्रकल्पातील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
लालबागच्या राजाच्या चरणी भरभरून दान;
दोन दिवसांत १.३७ कोटींची रोकड Top 15 News:
गणेशोत्सवात मुंबईकरांचं श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. बाप्पाच्या चरणी भाविकांकडून मोठ्या प्रमाणात दान अर्पण केलं जात आहे. दुसऱ्या दिवशी लालबागच्या राजाच्या चरणी तब्बल ८८ लाख ९० हजार रुपयांचं दान जमा झालं. यामध्ये स्टेज पेटीत ५९ लाख ७० हजार, तर रंगपेटीत २९ लाख ३० हजार रुपयांचा समावेश आहे. तसेच २२६ ग्रॅम सोनं आणि ५ हजार ५१६ ग्रॅम चांदी अर्पण करण्यात आली. पहिल्या दिवशी ४८ लाख ५० हजारांचं दान मिळालं होतं. त्यामुळे दोन दिवसांत एकूण १ कोटी ३७ लाख ४० हजार रुपयांचं दान जमा झालं आहे.
बाहेरचा मूर्तीकार नाही;
मंडळाच्या तरुणांनीच साकारला कागदी बाप्पा
मुंबईतील लोअर परळ आणि करी रोड परिसरातील ‘बालसाथी मित्र मंडळा’ने यंदा पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारली आहे. ६३ वर्षांची परंपरा असलेल्या या मंडळाने तब्बल १४ फुटांची कागदी गणेशमूर्ती तयार केली आहे. सुमारे १४ ते २० किलो कागदाचा वापर करून दोन महिन्यांच्या मेहनतीनंतर ही मूर्ती साकारण्यात आली. विशेष म्हणजे, बाहेरील मूर्तीकाराला न बोलावता मंडळातील शाळकरी मुले, कॉलेज तरुण आणि नोकरदारांनी एकत्र येत बाप्पाची मूर्ती तयार केली. कागदाचा पुनर्वापर आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला आहे.
सत्तेत दोस्ती, महासभेत कुस्ती!
उल्हासनगरमध्ये शिवसेना-भाजप आमनेसामने
उल्हासनगर महापालिकेच्या महासभेत सत्तेत एकत्र असलेल्या शिवसेना-भाजपमधील मतभेद उघड झाले. भाजप नगरसेवक प्रधान पाटील यांच्या वक्तव्यावरून महापौर अश्विनी निकम संतप्त झाल्या. त्यांनी पाटील यांना सभागृहाबाहेर जाण्याचे निर्देश दिले; मात्र त्यांनी नकार दिल्याने गोंधळ झाला. त्यानंतर महापौरांनी त्यांच्या निलंबनाचे आदेश दिले. दरम्यान, एंटीलिया घाटाला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याच्या प्रस्तावावरूनही दोन्ही पक्षांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. महापौरांनी भोजनावकाश जाहीर केल्यानंतर उपमहापौर अमर लुंड यांनी महापौरांच्या खुर्चीवर बसून कामकाज पुढे नेण्याचा प्रयत्न केला. अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे या कामकाजाच्या वैधतेवरही प्रश्न उपस्थित झाले.
५० दिवस पावसाची दडी;
शेतकऱ्यांसाठी २३ सप्टेंबरला शिवसेनेचा मोर्चा
यवतमाळ जिल्ह्यात गेल्या ५० दिवसांपासून पाऊस नसल्याने सोयाबीन आणि कापूस पिकांचे नुकसान झाल्याचा दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केला आहे. या पार्श्वभूमीवर २३ सप्टेंबरला यवतमाळात भव्य शेतकरी मोर्चा काढण्यात येणार आहे. आमदार नितीन बापू देशमुख यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शेतकऱ्यांना कोणतीही अट न घालता ५० हजार रुपयांची सरसकट मदत, पीकविम्याचे जुने निकष लागू करणे, जनावरांसाठी चारा डेपो सुरू करणे आणि महावितरणकडून २४ तास वीजपुरवठा करणे, अशा मागण्या मोर्चातून करण्यात येणार आहेत. मोर्चासाठी जिल्ह्यातील विविध गावांमध्ये शेतकरी बैठका आणि जनजागृती सुरू असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.
मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी धरणे आंदोलन;
रमेश बोरनारेंचा पाठिंबा
मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. मराठवाडा समन्यायी पाणी वाटप संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात येत आहे. जायकवाडीचे हक्काचे पाणी मराठवाड्याला मिळावे, रखडलेले सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करावेत आणि सिंचन अनुशेष दूर करावा, अशा आंदोलकांच्या मागण्या आहेत. शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आंदोलनस्थळी भेट देत पाठिंबा दर्शवला. मराठवाड्याचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन आमदार रमेश बोरनारे यांनी केले.
गणेशोत्सवात कांदा महागला;
दर आठवड्याला ५ रुपयांची वाढ
गणेशोत्सवाच्या काळात कांद्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात कांद्याची आवक घटल्याने घाऊक बाजारातील दर ५० रुपयांवर पोहोचले आहेत. व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, कांद्याच्या दरात दर आठवड्याला सुमारे पाच रुपयांची वाढ होत आहे. गणेशोत्सवामुळे भाजीपाल्याची मागणी वाढली असताना कांद्याची आवक कमी झाल्याने दरवाढीचा परिणाम झाला आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे बजेट वाढण्याची शक्यता आहे. आगामी काळात कांद्याची आवक वाढली नाही, तर दर आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
कॅन्सरच्या बोगस औषधांचा काळाबाजार;
५ कोटींचा साठा जप्त, ३ राज्यांत नेटवर्क
बंगळुरूमध्ये कॅन्सरसह गंभीर आजारांवरील बनावट औषधांच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. पोलिसांनी बिदादी आणि दोड्डेरी येथील फार्महाऊसवर छापा टाकून सुमारे ५ कोटी रुपयांचा बनावट औषधसाठा जप्त केला. ९० हून अधिक रुग्णालये, क्लिनिक्स आणि मेडिकल स्टोअर्सना ५० टक्के सवलतीचे आमिष दाखवून ही औषधे पुरवल्याचा आरोप आहे. कालबाह्य औषधांवर नवीन कंटेनर आणि नामांकित कंपन्यांची बनावट लेबल लावली जात होती. या रॅकेटचे नेटवर्क महाराष्ट्र, तमिळनाडू आणि हरियाणापर्यंत असल्याचे तपासात समोर आले आहे. १५ एजंटमार्फत औषधांचे वितरण केले जात होते. मुख्य सूत्रधार प्रशांत अद्याप फरार असून, पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
राहुल-प्रियंकांकडून काँग्रेसच्या ६४ सचिवांचे मूल्यांकन;
निम्मे बदलण्याची शक्यता
काँग्रेसमध्ये मोठ्या संघटनात्मक फेरबदलाची तयारी सुरू असताना राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांनी ६४ AICC सचिवांचे मूल्यांकन केले. १० जनपथ येथे झालेल्या बैठकीत सचिवांना चार गटांत विभागून प्रत्येकी पाच ते सहा प्रश्न विचारण्यात आले. काँग्रेसची कोणती चूक सुधारण्याची गरज आहे, आपल्या राज्यातील पाच प्रमुख कार्यकर्ते कोण, तसेच तीन सर्वोत्तम AICC सचिव कोण, असे प्रश्न विचारण्यात आले. काही सचिवांच्या उत्तरांमध्ये मुद्देसूदपणाचा अभाव असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, काँग्रेसकडून सुमारे १३० इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या असून, विद्यमान ६४ सचिवांपैकी सुमारे निम्म्यांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
भारत-चीनवर १००% शुल्क?
अमेरिकेत रशियावरील निर्बंधांचे विधेयक मंजूर
अमेरिकेच्या प्रतिनिधी सभेने रशिया आणि इराणवरील निर्बंधांचे विधेयक२६२-१५९ मतांनी मंजूर केले. ‘लिंडसे ओ. ग्रॅहम सँक्शनिंग रशिया अँड इराण ॲक्ट’नुसार, रशियाकडून तेल किंवा गॅस खरेदी करणाऱ्या काही देशांवर१००% पर्यंत शुल्क लावण्याचा अधिकार राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मिळू शकतो.भारत आणि चीन या संभाव्य लक्ष्यांमध्ये आहेत. मात्र, भारतावर १००% शुल्क सध्या लागू झालेले नाही.विधेयक आता ट्रम्प यांच्या स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आले आहे.
ऋषभ पंतला वनडेत स्थान नाही;
BCCIने दिली मोठी जबाबदारी
वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे आणि टी-२० मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघ जाहीर केला आहे. वनडे मालिकेत शुभमन गिल, तर टी-२० मालिकेत श्रेयस अय्यर भारताचे नेतृत्व करणार आहे. ऋषभ पंतला दोन्ही संघांत स्थान मिळालेले नाही. मात्र, त्याच्याकडे इराणी कपमध्ये शेष भारत संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शेष भारत आणि रणजी विजेता जम्मू-काश्मीर यांच्यात १ ते ५ ऑक्टोबरदरम्यान श्रीनगरमध्ये सामना होणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध भारताची तीन वनडे सामने २७ सप्टेंबर, ३० सप्टेंबर आणि ३ ऑक्टोबरला होणार आहेत. त्यानंतर ६ ते १७ ऑक्टोबरदरम्यान पाच टी-२० सामने खेळवले जातील.
सेन्सॉर बोर्डाची पुनर्रचना;
प्रीती झिंटा,पंकज त्रिपाठींसह 18 नव्या सदस्यांची एन्ट्री Top 15 News:
केंद्र सरकारने ‘सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन’ अर्थात सेन्सॉर बोर्डाची पुनर्रचना केली आहे. नव्या मंडळात अभिनेत्री प्रीती झिंटा, अभिनेते पंकज त्रिपाठी, सुनील शेट्टी, पल्लवी जोशी, रुपाली गांगुली, मनोज जोशी यांच्यासह 18 नव्या सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. बंगाली अभिनेता प्रसेनजित चॅटर्जी, संगीतकार रिकी केज, दिग्दर्शक प्रियदर्शन, गायक हंसराज हंस यांचाही यात समावेश आहे. नाट्यदिग्दर्शक वामन केंद्रे आणि लेखक रमेश पतंगे यांचा पुन्हा मंडळात समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी 2017 मध्ये मंडळाची पुनर्रचना झाली होती. त्यानंतर नव्या पुनर्रचनेअभावी सदस्य कार्यरत होते. नव्या मंडळात बॉलिवूडसोबत प्रादेशिक आणि दूरचित्रवाणी क्षेत्रातील व्यक्तींनाही संधी मिळाली आहे.





