Top 15 News: राज्यातील सर्वात लांब उड्डाणपुलाचे आज उद्घाटन ते तृणमूलच्या दोन गटांना नवीन नावे आणि चिन्हे; जाणून घ्या TOP 15 News
Top 15 News: राज्य, देश-विदेश, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी...

Top 15 News: 1. राज्यातील सर्वात लांब उड्डाणपुलाचे आज उद्घाटन
राज्यातील सर्वात लांब उड्डाणपुलाचे उद्घाटन आज (19 सप्टेंबर ) होणार आहे. उत्तर आणि दक्षिण नागपूरला जोडणारे तब्बल 8.9 किलोमीटर लांबीचा हा उड्डाणपुल आहे. उत्तर नागपूरातील इंदोरापासून सुरू होणारे हे उड्डाणपूल दक्षिण नागपूरातील दिघोरी परिसरापर्यंत जाणार आहे. त्यामुळे या उड्डाणपुलाच्या माध्यमातून नागपूरकरांना थेट उत्तर नागपुरातून दक्षिण नागपूरपर्यंत वाहतूक कोंडी शिवाय वेगाने जाणे शक्य होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज संध्याकाळी या उड्डाणपुलाचे उद्घाटन पार पडेल. सुमारे 998 कोटी रुपये खर्च करुन तयार केलेला हा उड्डाणपूल महाल परिसरातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या घराच्या जवळून जातो. त्यामुळे या उड्डाणपुलाला डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी केली जात आहे.
2. शरद पवारांच्या पत्रावर मुख्यमंत्री फडणविसांनी मांडली भूमिका
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी औपचारिक निकष न पाहता राज्यात दुष्काळ जाहीर करा अशी मागणी शरद पवार यांनी पत्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. शरद पवारांनी लिहलेल्या पत्राबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “राज्य सरकारने यापूर्वीच याबाबतचे निर्णय घेतलेले आहेत. गेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दुष्काळ आणि संभाव्य मदतीच्या संदर्भात चर्चा झाली आहे. अगोदरच कर्जमाफीची योजना सुरु आहे. तीन याद्या झाल्यात, इतर याद्या करत असूनपात्र शेतकऱ्यांना मदत करणार आहोत. दुष्काळाच्या उपाययोजना देखील सुरु करत आहोत. दुष्काळाची स्थिती राज्य सरकारने गांभीर्याने घेतली आहे”, असे फडणवीसांनी सांगितले. तसेच पवारांनी लिहलेल्या पत्राला राजकीय रंग न देता त्यांच्याकडून आणखी सूचना आल्या तर ऐकू असेही त्यांनी स्पष्ट केले.
3. गणपतीच्या आरतीवेळीच सुरगाणा तालुक्यात भूकंपाचे धक्के; गावकरी भयभीत
नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. शुक्रवारी रात्री सुरगाण्यातील घाटमाथ्यावरील परिसरात भूकंपाचे दोन सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. काल रात्री ७.१९ वाजता घाटमाथ्यावरील डांगराळे, शिंदे दिगर, रोकडपाडा, कुंभीपाडा आणि भरडमाळ या भागात पहिला धक्का बसला, ज्याची तीव्रतेचा अंदाज ३.४ रिस्टर स्केल वर्तवला जात आहे. यानंतर रात्री १०.४० मिनिटांच्या सुमारास दुसऱ्यांदा कमी तीव्रतेचा धक्का जाणवला. सुरगाणा तालुक्यात ऐन गणेशोत्सवाच्या उत्साहात नागरिक आरतीसाठी एकत्र जमले असतानाच अचानक जमीन हादरली. एकापाठोपाठ एक भूकंपाचे दोन धक्के बसल्यान गावकरी प्रचंड घाबरले. वारंवार बसणाऱ्या या धक्क्यांमुळे संपूर्ण सुरगाणा परिसरात सध्या दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
4. नवले पुलावर पुन्हा अपघात! ब्रेक फेल झाल्याने 3 ट्रक एकमेकांवर आदळले
पुण्यातील नवले पूल परिसरातील भूमकर पुलावर पुन्हा एकदा अत्यंत भीषण अपघात घडला आहे. एका मालवाहू ट्रकचे ब्रेक फेल झाल्यामुळे तो भरधाव वेगात समोरील ट्रकला जाऊन धडकला. त्यानंतर एका मागोमाग तीन ट्रक एकमेकांवर आदळले. यात ट्रकच्या पुढच्या भागाचा अक्षरशः चुराडा झाला. या दुर्दैवी अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तर, ३ ते ४ जण जखमी झाले आहेत. अपघातात गंभीर जखमी झालेल्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नवले पुलाजवळ वारंवार होणाऱ्या अपघातांच्या मालिकेमुळे पुन्हा एकदा पुणेकरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
5. मनोज जरांगे यांच्या मुलाच्या उपचारस्थळी शिंदेंविरोधात कट रचल्याचा आरोप
मनोज जरांगे यांच्या मुलावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू असताना, त्याच ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात कट रचल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. सामाजिक आंदोलनाचा बुरखा घालून शिंदे यांचे राजकीय चरित्र खराब करण्याची सुपारी घेतल्याचा दावाही राज्य मराठा समन्वयक संजय लाखे यांनी केला आहे. शिंदे यांनी मराठा समाजातील पात्र लाभार्थ्यांना कुणबी आणि SEBC प्रमाणपत्रे देण्यासाठी काम केल्याचा उल्लेखही त्यांनी केला. तसेच शिंदेंविरोधात राजकीय आघाडी उघडण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपांमुळे मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिंदे-दानवे राजकीय संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे.
6. गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या एकनाथ शिंदेंची सफरचंद बागेची पाहणी
गणेशोत्सवाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांच्या मुक्कामासाठी आपल्या मूळ गावी दरे येथे दाखल झाले आहेत. गावी आल्यानंतर त्यांनी सकाळी आपल्या निवासस्थानी गणरायाची आरती करत दर्शन घेतले. त्यानंतर दुपारच्या सुमारास एकनाथ शिंदे यांनी सफरचंदाची बाग, तसेच इतर बागायती शेतीची त्यांनी पाहणी केली. गावी आल्यानंतर शेतीशी नाळ जोडलेली ठेवत शेतातील कामांची आणि फळझाडांची पाहणी करण्याची त्यांची परंपरा यावेळीही पाहायला मिळाली. यावेळी नाराजी आणि दौऱ्यांवरून होणाऱ्या टीकेला एकनाथ शिंदे यांचे प्रत्युत्तर दिले. ’गावी गेलो, दिल्लीला गेलो किंवा लंडनला गेलो तरी विरोधक टीका करतात; पण प्रत्येक दौरा हा राज्याच्या कामासाठीच असतो,’ असे म्हणत विरोधकांना टोला लगावला.
7. घरकुल लाभार्थ्यांच्या नव्या घरात ‘आशीर्वादाचा दिवा’
मंत्री जयकुमार गोरे यांची घरकुल लाभार्थ्यांच्या घरी भेट
प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून हक्काचे पक्के घर मिळालेल्या कुटुंबांच्या नव्या घरात ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करून त्यांच्या आनंदात सहभागी होण्याचा उपक्रम आंधळी येथे राबविण्यात आला. ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी घरकुल लाभार्थ्यांच्या घरी भेट देत त्यांच्याशी संवाद साधला.पंतप्रधान मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या समर्पित जनसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. यावेळी लाभार्थ्यांच्या नव्या घरात ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करण्यात आला. तसेच गणेशोत्सवानिमित्त लाभार्थ्यांच्या घरी गणरायाची भक्तिभावाने आरती करून आशीर्वाद घेतले. नव्या घराच्या उंबरठ्यावर गणरायाची आरती आणि ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करण्याचा हा क्षण लाभार्थी कुटुंबांसाठी आनंददायी आणि भावनिक ठरला.
8. NCMC कार्डच्या नोंदणी आणि वितरणाची पद्धत बदललं
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सवलतींचा प्रवास सुलभ करण्यासाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड अर्थात NCMC योजनेत बदल केले आहेत. अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेतील अनेक लाभार्थ्यांचे वाढत्या वयामुळे किंवा इतर कारणांमुळे बायोमेट्रिक (बोटांचे ठसे) जुळण्यात अडचणी येत होत्या. यावर तोडगा म्हणून महामंडळाने 21 सप्टेंबर 2026 पासून आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर येणाऱ्या OTP द्वारे नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे ज्या प्रवाशांचे बोटांचे ठसे जुळत नाहीत, त्यांना आता विनाअडचण नोंदणी करता येईल. दरम्यान, प्रवासादरम्यान एनसीएमसी कार्ड गहाळ किंवा चोरीला गेल्यास प्रवाशांचे नुकसान होऊ नये म्हणून २१ सप्टेंबरपासून जुने कार्ड ब्लॉक करून 199 रुपये शुल्क भरून नवीन कार्ड नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
9. पावसाचा जोर पुन्हा वाढणार! विदर्भात येलो अलर्ट जारी
राज्यातील काही भागात पुढील काही दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, आजपासून राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागात ढगाळ हवामानासह काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली या भागात ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, अमरावती, अकोला आणि यवतमाळ परिसरातही येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
10. निफाडमध्ये मोकाट कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर;
साडेपाच महिन्यांत ८०० नागरिकांना रेबीज प्रतिबंधक लस
निफाड नगरपंचायत हद्दीत मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनला असून, माहितीच्या अधिकारातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या साडेपाच महिन्यांत निफाड उपजिल्हा रुग्णालयात जवळपास ८०० नागरिकांना रेबीज प्रतिबंधक लस देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. नगरसेवक सचिन मोरे यांनी माहितीच्या अधिकारातून ही माहिती मिळवली आहे. मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी नगरपंचायतीने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे यांनी सहकाऱ्यांसह निफाड नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात मोकाट कुत्रे सोडून आंदोलन केले होते. या प्रकरणी पाच आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
11. “…पण काँग्रेस घाबरणार नाही,” काँग्रेस उमेदवारच्या अटकेनंतर राहुल गांधींचा इशारा
पश्चिम बंगालमधील नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार मिलन प्रधान यांना अटक करण्यात आली आहे. याचे राजकीय पडसाद उमटले आहेत. या कारवाईनंतर राहुल गांधी यांनी संताप व्यक्त केला आहे. “नंदीग्राम पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार मिलन प्रधान यांना करण्यात आलेली अटक, हा काही योगायोग नाहीये. राजकीय सूडबुद्धी आहे. लोकशाहीची हत्या आहे. भाजपाचा निष्पक्ष निवडणुकींवर विश्वास नाही. त्यामुळेच कधी मतचोरी, कधी सरकार चोरी आणि कधी पक्ष चोरी करून सत्ता वाचवायची असते. त्यांना निवडणुका लढवायची इच्छा नाही, तर त्यांना निवडणुकीतील लढाईच संपववून टाकायची आहे. पण काँग्रेस घाबरणार नाही, झुकणार नाही. आम्ही लढू आणि आम्ही जिंकूही”, अशी टीका राहुल गांधी यांनी भाजपावर केली.
12. तृणमूलच्या दोन गटांना नवीन नावे आणि चिन्हे
तृणमूल काँग्रेसच्या नाव व निवडणूक चिन्हावरून सुरू असलेल्या अंतर्गत संघर्षाने नवे वळण घेतले. निवडणूक आयोगाने आगामी पोटनिवडणुकांसाठी पक्षाचे मूळ नाव ‘अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस’ आणि पारंपरिक ‘दोन फुले व गवत’ हे चिन्ह दोन्ही गटांसाठी अंतरिम स्वरूपात गोठवले. प. बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आयोगाच्या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतला. हा लोकशाहीच्या इतिहासातील ‘काळा दिवस’ असल्याचे त्यांनी म्हटले. मूळ नाव व चिन्ह मिळविण्यासाठी राजकीय, लोकशाही मार्गाने तसेच कायदेशीर लढा देण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. दरम्यान, आता ममता बॅनर्जी यांच्या गटाला ‘ममता अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस’ हे नाव आणि ‘फुटबॉल खेळाडू’ हे चिन्ह, तर अरूप रॉय यांच्या गटाला ‘लोकशाहीवादी तृणमूल काँग्रेस’ हे नाव आणि ‘लिफाफा’ हे चिन्ह देण्यात आले.
13 . ट्रम्प यांचे दोन मोठे निर्णय! नव्या कायद्याने भारतावर टॅरिफची टांगती तलवार
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी दोन मोठे निर्णय घेतले आहेत. ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती देत, सीएनएन, एमएस नाऊ आणि पॉलिटिको या तीन प्रमुख माध्यमांवर व्हाईट हाऊसमध्ये रिपोर्टिंग करण्यावर बंदी घातली आहे. ही माध्यमे सातत्याने फेक न्यूज पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला. तर दुसऱ्या बाजूला रशिया आणि इराणवर कठोर निर्बंध लादणाऱ्या नव्या कायद्यावर स्वाक्षरी केली आहे. हा कायदा लागू झाल्यानंतर पुढील ३० दिवसांत अध्यक्षांना रशियन तेल आणि नैसर्गिक वायू खरेदी करणाऱ्या देशांवर १०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लादण्याचे थेट अधिकार मिळतात. या नव्या कायद्यामुळे रशियाकडून कच्चा तेल आणि नैसर्गिक वायू खरेदी करणाऱ्या भारत व चीनसारख्या देशांवर १०० टक्के टॅरिफ लागू होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
14. आशियाई स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात मनू आणि तेजिंदर फडकवणार तिरंगा
जपानमधील आयची-नागोया येथे शनिवारपासून सुरू होणाऱ्या २०व्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या दिमाखदार उद्घाटन सोहळ्यासाठी भारताचे ध्वजवाहक जाहीर झाले आहेत. पॅरिस ऑलिम्पिकमधील दुहेरी कांस्यपदक विजेती नेमबाज मनू भाकर आणि गोळाफेकमधील दोन वेळचा सुवर्णपदक विजेता तेजिंदरपाल सिंग तूर यांच्याकडे भारतीय पथकाचे नेतृत्व करत तिरंगा फडकवण्याचा बहुमान सोपवण्यात आला आहे. पालोमा मिझुहो स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी २:३० ते ४:३० दरम्यान हा उद्घाटन सोहळा रंगणार असून, ४ ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या महाकुंभात ५०० हून अधिक भारतीय खेळाडू ३७ क्रीडा प्रकारांत भारताचे प्रतिनिधित्व करतील.
15. ‘सैराट’ फेम अरबाज शेखने तुकाराम मुंडेंचे मानले आभार
“तुमच्यासारख्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्याची गरज”
‘सैराट’ चित्रपटातील अभिनेता अरबाज शेखने काही महिन्यांपूर्वी वडिलांवर सोलापूरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना रुग्णालयातील कथित गैरप्रकारांबाबत सोशल मीडियावर आवाज उठवला होता. त्यानंतर संबंधित रुग्णालयाच्या मेडिकलवर अन्न आणि औषध प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली होती. यानंतर अरबाज ने इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत तुकाराम मुंढे यांचे आभार मानले आहेत. त्याने म्हटले की, “थँक्यू सो मच… तुकाराम मुंडे साहेब. हॉस्पिटलच्या तक्रारी याआधी अनेक लोकांनी केल्या, पण त्या तक्रारीवर तातडीने ॲक्शन घेण्याची भूमिका तुम्ही घेतली. यासाठी खरंच धन्यवाद. महाराष्ट्राला तुमच्यासारख्या प्रामाणिकपणे कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याची खूप गरज आहे,” असे म्हणत अरबाजने तुकाराम मुंडेंचे आभार मानले.
हेही वाचा:
Child Friendly Bus: बालकांच्या सुरक्षिततेसाठी चाइल्ड फ्रेंडली बस; पोलीस आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन









