बीजिंग- गेल्या काही काळात रशिया आणि चीन यांच्यातील जवळीक वाढत चालली असून त्यावर आता काही तज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ही जवळीक चीनच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारी ठरेल असा इशाराही काही जणांनी दिला आहे. राष्ट्रपती पदावर फेरनिवड झाल्यावर ब्लादीमिर पुतीन चीनच्या भेटीवर आले होते. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी पुतीन यांची गळाभेट घेत त्यांचे स्वागत केले होते. युक्रेनच्या युध्दानंतर युरोपीय देशांनी रशियावर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे तूर्त रशियाचे चीनवरील अवलंबित्व वाढले आहे. आता ज्या बातम्या येत आहेत त्यानुसार या दोन्ही देशांनी अमर्याद स्वरूपाची अर्थात अनलिमिटेड अशी मैत्री करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे चीनमधील एक अभ्यासक आणि इतिहासकार शेन झिहुआ यांनी जिनपिंग सरकारला इशारा दिला आहे. आपल्याला असे वाटते की रशियाच्या राष्ट्रपतींना भूतकाळात जायचे आहे. रशियन साम्राज्याची पुन्हा निर्मिती करायची अशी त्यांची इच्छा आहे. जे देश कधीकाळी रशियाचा भाग होते मात्र नंतर त्यांच्यापासून वेगळे झाले त्या ठिकाणांवर पुतीन यांना पुन्हा त्यांचा दबदबा निर्माण करायचा आहे. मात्र पुतीन यांची ही योजना वास्तविक चीनसाठी अत्यंत धोक्याची आहे असे झिहुआ यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की अमेरिका आणि पश्चिमेकडचे देश रशिया आणि चीनच्या योजनेचा विरोध करत आहेत. चीन आणि अमेरिका यांच्यातील संबंधही आता चांगले राहीलेले नाहीत. रशियाही अमेरिकेवर चिडला आहे. अशा स्थितीत जर रशिया आणि चीन एकत्र आले तर शत्रुत्व वाढू शकते. चीनने अशा परिस्थितीत आपल्या परराष्ट्र धोरणावर कायम राहीले पाहिजे. त्यांनी अन्य कोणाशी आघाडी करण्याची गरज नाही. झिहुआ पुढे म्हणाले की रशिया आता उत्तर कोरियाच्याही जवळ गेला आहे. चीन आणि अमेरिकेचे संबंध बिघडल्यामुळे आता अमेरिका जपान आणि दक्षिण कोरियाच्या लष्कराशी आघाडी करते आहे. यातून युध्दाचा धोका असून चीनला सावध राहावे लागेल. रशियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या नंतर चीनच्या नेत्यांनी उत्तर कोरियाची यात्रा केली. त्याचाही आता पश्चिमेकडच्या देशांमध्ये चुकीचा संदेश जाणार आहे.