राज्यस्तरावर दोस्ती, पण मावळात कुस्ती! जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने शेळके-भेगडे गटात संघर्ष पेटणार?

प्रभात वृत्तसेवा
वडगाव मावळ – आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर मावळ तालुक्यातील राजकीय वातावरण रंगू लागले आहे. सोमवारी आरक्षण सोडत जाहीर होणार असून त्यानंतर या निवडणुकांच्या तयारीला अधिक वेग येण्याची शक्यता आहे. या निवडणुका रंगतदार होणार असून सर्वच पक्षांनी रणसंग्रामाची तयारी सुरू केली आहे.मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेचे पाच गट आणि पंचायत समितीचे दहा गण असून प्रत्येक ठिकाणी इच्छुक उमेदवार हालचालींना वेग देत आहेत.
सध्या तरी प्रत्येक गट व गणातून भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना (एकनाथ शिंदे गट), काँग्रेस तसेच इतर स्थानिक आघाड्यांचे उमेदवार उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.राज्य पातळीवर महायुती सत्तेवर आहे. त्यामध्ये भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार) व शिवसेना (शिंदे गट) या तीन पक्षांचा समावेश आहे, परंतु मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे आमदार सुनील शेळके यांचे वर्चस्व दिसून येत आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी तालुक्यात संघटनात्मक बांधणी मजबूत केली असून, आता जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघांमध्ये त्यांनी आपला प्रभाव वाढवला आहे.विधानसभा निवडणुकीच्या काळात महायुतीतील दोन प्रमुख नेते माजी राज्यमंत्री बाळा भेगडे (भाजप) आणि आमदार सुनील शेळके (राष्ट्रवादी अजित पवार गट) यांच्यात उमेदवारीवरून मतभेद निर्माण झाले होते. भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांनी भेगडे गटाचा पाठींबा घेतल्यामुळे राजकीय समीकरणे ढवळून निघाली होती. मात्र शेवटी आमदार शेळके यांनी जनतेचा कौल मिळवून विजय मिळवला.
आता पुन्हा एकदा दोन्ही नेते स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी सज्ज झाले आहेत. महायुती म्हणून निवडणुका लढवण्याचे सार्वजनिक वक्तव्य दोघांनीही केले आहेत. जिल्हा परिषद गटांमध्ये आणि पंचायत समिती गणांमध्ये दोन्ही नेत्यांकडून चाचपणी सुरू आहे. राजकीय समीकरणे आरक्षण सोडतीनंतर अधिक स्पष्ट होतील, मात्र सध्या तरी तालुक्यातील राजकीय वातावरणात उत्सुकता आणि चर्चा दोन्हीही शिगेला पोहोचल्या आहेत.
बहुरंगी लढतींची शक्यता..
राज्य पातळीवर महायुती व महाआघाडी या दोन आघाड्यांमध्ये लढत होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात असली तरी मावळ तालुक्यात मात्र बहुरंगी लढती होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. प्रत्येक पक्षातील इच्छुकांची संख्या मोठी असल्याने मैत्रीपूर्ण लढती या नावाखाली स्वतंत्र उमेदवारही मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे तालुक्यातील निवडणुका अधिक चुरशीच्या होणार असल्याचा अंदाज आहे.
जिल्हा परिषद गट ५
-टाकवे बुद्रुक गट, इंदोरी गट, खडकाळे गट, कुसगाव बुद्रुक गट, सोमाटणे गट
मावळ पंचायत समिती गण १०
-टाकवे बु, वडेश्वर, वराळे, इंदोरी, खडकाळे, कार्ला, कुसगाव बु, काले, सोमाटणे, चांदखेड





