French Open 2024 : गॉफचा पराभव करत ‘इगा स्विटेक’ची अंतिम फेरीत धडक…

French Open 2024 (I. Swiatek vs C. Gauff) : पोलंडची अग्रमानांकित इगा स्विटेकने आपले वर्चस्व कायम राखताना फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पाच वर्षांत चौथ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीच्या लढतीत स्विटेकने तिसऱ्या मानांकित अमेरिकेच्या कोको गॉफला 6-2, 6-4 असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. फ्रेंच स्पर्धेतील हा तिचा सलग 20 वा विजय ठरला.
गतवर्षी अमेरिकन खुली स्पर्धा जिंकणाऱ्या गॉफला स्विटेकसमोर फारसे आव्हान उपस्थित करता आले नाही. स्विटेकने सामन्याची दमदार सुरुवात करताना पहिल्याच गेममध्ये गॉफची सर्व्हिस तोडली. त्यानंतर आपली सव्र्हिस राखताना तिने 3-1 अशी आघाडी घेतली. मग पुन्हा गॉफची सर्व्हिस तोडत स्विटेकने सेटवरील पकड अधिकच घट्ट केली. यानंतर गॉफला पुनरागमन करता आले नाही आणि स्विटेकने पहिला सेट सहज जिंकला.
दुसऱ्या सेटमध्ये गॉफने सुरुवात चांगली केली होती. तिने चौथ्या गेममध्ये स्विटेकची सर्व्हिस तोडताना 3-1 अशी भक्कम आघाडी घेतली. मात्र, स्विटेकने ‘लाल माती’च्या कोर्टवर खेळताना आपले वेगळेपण पुन्हा सिद्ध केले. तिने पुढील तीन गेममध्ये गॉफची सर्व्हिस दोन वेळा मोडताना आणि आपली सर्व्हिस राखताना 4-3 अशी आघाडी मिळवली. यानंतर आपला चांगला खेळ सुरू ठेवत स्विटेकने दुसरा सेट 6-4 असा जिंकत फ्रेंच स्पर्धेतील सलग तिसऱ्या जेतेपदाच्या आशा कायम राखल्या.
French Open 2024 : बोपन्ना-एबडेन जोडीला उपांत्य फेरीत पराभवाचा धक्का…
अंतिम फेरीत स्विटेक समोर पाओलिनीचं आव्हान
आतापर्यंत चार ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या स्विटेकने फ्रेंच ओपनमधील विजयी मोहीम 20 सामन्यांपर्यंत वाढवली आहे. शनिवारी होणाऱ्या अंतिम फेरीत तिचा सामना 12व्या मानांकित इटलीच्या जस्मिन पाओलिनीशी होणार आहे. पाओलिनीने अन्य उपांत्य फेरीत रशियाच्या 17 वर्षीय बिगरमानांकित मीरा अँड्रीवाचा 6-3, 6-1 असा पराभव केला.
ज्वेरेवची आगेकूच
विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार असलेल्या जर्मनीच्या अॅलेक्झांडर ज्वेरेवने अॅलेक्स डी मिनौरचा 6-4, 7-6 (7-5), 6-4 असा सरळ सेटमध्ये पराभव करताना फ्रेंच खुल्या स्पर्धेत पुरुष एकेरीची सलग चौथ्यांदा उपांत्य फेरी गाठली.





