French Open 2024 : शानदार विजयासह जोकोविचची तिसऱ्या फेरीत धडक, मेदवेदेवचीही आगेकूच….

French Open 2024 (Novak Djokovic vs Roberto Carballes) : आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करणाऱ्या नोव्हाक जोकोविचने गुरुवारी येथे सलग सेट जिंकून फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. रॉबर्टो कार्बालेस बेयनाचा पराभव करताना जोकोविचला कोणतीही अडचण आली नाही.
या सामन्यात जोकोविचने प्रतिस्पर्ध्याला कोणत्याही वेळी वर्चस्व गाजवण्याची संधी दिली नाही आणि दोन तास चार मिनिटे चाललेल्या या सामन्यात स्पॅनिश खेळाडूचा 6-4, 6-1, 6-2 असा सलग सेटमध्ये पराभव केला.
मेदवेदेवनेही गाठली तिसरी फेरी….
पुरुष गटात पाचव्या मानांकित डॅनिल मेदवेदेवनेही तिसरी फेरी गाठली आहे. रशियन खेळाडू 6-1, 5-0 ने आघाडीवर असताना त्याचा प्रतिस्पर्धी मिओमिर केचमानोविचने सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. राफेल नदालचा पराभव करणाऱ्या अलेक्झांडर झ्वेरेव्हने आपली विजयी मोहीम सुरूच ठेवली. त्याने डेव्हिड गॉफिनचा 7-6 (4), 6-2, 6-2 असा पराभव केला.





