“राज्यात १२५ युनिट वीज मोफत” ; बिहार निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांची मोठी घोषणा

Free Electricity in Bihar। बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी राज्यातील पात्र कुटुंबांना १२५ युनिट वीज मोफत देण्याची घोषणा केली आहे. या योजनेचा लाभ राज्यातील सुमारे १ कोटी ६७ लाख कुटुंबांना मिळण्याची अपेक्षा आहे. १ ऑगस्ट २०२५ पासून, म्हणजेच जुलैच्या बिलापासून, राज्यातील सर्व घरगुती ग्राहकांना १२५ युनिटपर्यंतच्या विजेसाठी कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याविषयी माहिती दिली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये, ‘आम्ही सुरुवातीपासूनच सर्वांना स्वस्त दरात वीज पुरवत आहोत. आता आम्ही निर्णय घेतला आहे की १ ऑगस्ट २०२५ पासून, म्हणजेच जुलै महिन्याच्या बिलापासून, राज्यातील सर्व घरगुती ग्राहकांना १२५ युनिटपर्यंतच्या विजेसाठी कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत. ” असे त्यांनी म्हटले. त्यासोबतच राज्यातील एकूण १ कोटी ६७ लाख कुटुंबांना याचा फायदा होईल. आम्ही असेही ठरवले आहे की पुढील तीन वर्षांत, या सर्व घरगुती ग्राहकांची संमती घेतल्यानंतर, त्यांना त्यांच्या घरांच्या छतावर किंवा जवळच्या सार्वजनिक ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प बसवून लाभ दिला जाईल” असेही त्यांनी यावेळी सांगितले.
संपूर्ण खर्च सरकार उचलणार Free Electricity in Bihar।
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुढे लिहिताना, ‘कुटीर ज्योती योजनेअंतर्गत, अत्यंत गरीब कुटुंबांसाठी सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्याचा संपूर्ण खर्च राज्य सरकार उचलेल आणि उर्वरित रकमेसाठी सरकार पुरेसा पाठिंबा देईल.’ असे म्हटले आहे. या योजनेमुळे घरगुती ग्राहकांना १२५ युनिटपर्यंतच्या विजेसाठी काहीही खर्च करावा लागणार नाही. एका अंदाजानुसार, पुढील तीन वर्षांत राज्यात १० हजार मेगावॅटपर्यंत सौर ऊर्जा उपलब्ध होईल. गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना आकर्षित करण्याची ही रणनीती विरोधकांसाठी आव्हान बनू शकते. वीज आघाडीवर नितीश कुमार यांचा हा निर्णय जनतेला एक मोठा संदेश देईल.
मोफत वीजेच्या घोषणेवर आरजेडीने काय म्हटले?
राष्ट्रीय जनता दलाचे नेते शक्ती सिंह यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या १२५ युनिट मोफत वीज देण्याच्या घोषणेवर म्हटले आहे की, ‘जर तेजस्वी यादवसारखा विरोधी पक्षनेता असेल तर नितीश कुमारांना नक्कीच झुकावे लागेल.’ याचे (मोफत वीज) श्रेय फक्त तेजस्वी यादव यांनाच द्यायला हवे.”
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी नितीश कुमारांचा डाव
बिहारमधील २४३ विधानसभेच्या जागांसाठी वर्षाच्या अखेरीस निवडणुका होणार आहेत. गेल्या विधानसभा निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२० मध्ये झाल्या होत्या. निवडणुकीनंतर राज्यात एनडीएने सरकार स्थापन केले आणि नितीश कुमार मुख्यमंत्री झाले. नंतर ऑगस्ट २०२२ मध्ये, नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जनता दल युनायटेड (जेडी(यू)) ने एनडीएपासून वेगळे होऊन आरजेडीच्या नेतृत्वाखालील महागठबंधनशी हातमिळवणी केली. तथापि, जानेवारी २०२४ मध्ये, नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जनता दल युनायटेड (जेडी(यू)) ने आरजेडीच्या नेतृत्वाखालील महाआघाडीपासून वेगळे होऊन एनडीएसोबत पुन्हा सरकार स्थापन केले.





