Pune News : स्व.आ.मुक्ता टिळक यांच्या दुसऱ्या स्मृतीदिनानिमित्त मोफत कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन

पुणे : स्व.आ.मुक्ता टिळक यांच्या दुसऱ्या स्मृतीदिनानिमित्त बी. जे. मेडीकल कॉलेज, ससून सर्वोपचार रुग्णालय, अमनोरा येस फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रज व मुक्ता टिळक मेमोरियल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २२ डिसेंबर रोजी कसबा भागातील स्वच्छ संस्थेच्या महिलांसाठी मोफत कर्करोग तपासणी शिबिर आयोजित केले होते.
या शिबिराला स्वच्छ च्या कचरा वेचक १५० महिलांनी सहभाग नोंदवला. या शिबिरात सर्व महिलांची ब्रेस्ट कॅन्सर ची तपासणी करण्यात आली व ज्यांना निदान झाले आहे त्या महिलांना ससून रुग्णालयात शासन मान्य योजनांतर्गत उपचार केले जाणार आहेत. या शिबिरात बी. जे. मेडीकल कॉलेज व ससून रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागाच्या प्राध्यापिका डॉ लता भोईर, अमनोरा येस फाउंडेशनचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे व उपाध्यक्ष विवेक कुलकर्णी हे उपस्थित होते.
२०२३ साली स्व.आ.मुक्ता टिळक यांच्या स्मरणार्थ मुक्ता टिळक मेमोराल फाउंडेशन या संस्थेची स्थापना करण्यात आली. स्वतः या तपासणीच्या अग्निदिव्यातून जाताना त्यांना ही जाणीव झाली की गरीब व गरजू महिला व पुरुष यांना कर्करोगाच्या खर्चिक आजारावर लवकरात लवकर तपासणी करून मात करणे आवश्यक आहे, या उद्देशाने ही संस्था स्थापन करण्यात आली.
स्व. मुक्ता टिळक महापौर असताना पुणे शहरातील वंचित घटकातील ९००० महिलांचे कर्करोग तपासणी करण्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात ४५ लाख रुपयाची तरतूद केली होती. तसेच महापालिकेच्या शाळेतील मुलींची शारीरिक तपासणी करण्याचा अभिनव उपक्रम त्यांच्या महापौर पदाच्या काळात राबविला. या उपक्रमाच्या मुळे महापालिकेच्या आरोग्य खात्याकडे या मुलींची वैद्यकीय माहिती एकत्रित तयार झाली.
गेल्या दीड वर्षात संस्थेनी आर्थिकरित्या दुर्बल असलेल्या १००० पेक्षा जास्त महिला वा पुरुषांसाठी स्क्रिनिंग व तपासणी शिबिर मोफत आयोजित केली होती. या शिबिरात ब्रेस्ट, सर्विकल, लंग्ज व थ्रोट कॅन्सर या खर्चिक तपासण्यांनची सुविधा उपलब्ध करून दिली. तसेच मागील वर्षात १७ कर्करोग रुग्णांना संस्थेद्वारे मोफत शस्त्रक्रिया, रेडिएशन व केमोथेरपी उपलब्ध करून देण्यात आली आहे.





