Pune | पीएमपीचे नवे मार्ग सुरू करण्यासाठी चार हजार प्रवाशांचा प्रतिसाद..

प्रभात वृत्तसेवा
पुणे- पीएमपीच्या ताफ्यात टप्यटप्याने नवीन बस दाखल होत असल्याने कोणत्या मार्गावर, कोणत्या वेळेत नवी बससेवा सुरू करायची, याबाबत प्रवाशांकडून अभिप्राय मागविले होते. यावर चार हजारांहून अधिक पुणेकरांनी अभिप्राय दिले आहेत. त्यामध्ये हिंजवडी, कात्रज, कोंढवा, लोहगाव, कोंढवा आणि उरळी कांचन मार्गावर अधिक बस सोडण्याची मागणी केली आहे.
पीएमपी सध्या पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीएच्या हद्दीत बससेवा देत असून दररोज दहा लाखांपेक्षा अधिक प्रवासी याचा लाभ घेतात. गेल्या काही महिन्यांत प्रवासी घटल्याने ते वाढविण्यासाठी बसफेऱ्यांसह नवे बस मार्ग सुरू करण्याबाबत ऑनलाईन अभिप्राय मागविले होते.
त्यामध्ये कोणत्या मार्गावर बस सुरू करायची, सध्याच्या मार्गावरील बस वेळेत बदल करायचा का?, बस संख्या वाढवायची का? पीएमपी सेवा चांगली आहे का?, नवीन मार्ग कोठे सुरू करायचे, दिवसभरात त्याची वांरवारिता कशी असावी, प्रवास करणारा पुरुष आहे की महिला याचा आढावा घेतला होता. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
“पीएमपी ताफ्यात नवीन बस दाखल झाल्याने संख्या वाढली आहे. प्रवाशांनी मागणी केलेल्या हिंजवडी, कात्रज, लोहगाव, उरळी कांचन, कोंढवा यांसह इतर ठिकाणांवरून नव्याने बस सुरू करण्यात येतील”.
-सतीश गव्हाणे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी





