प्रभात वृत्तसेवा तळेगाव दाभाडे – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेस (आय), शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे चारही पक्ष संयुक्तपणे निवडणूक लढवणार असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली.नगराध्यक्षपदासाठी देखील महाविकास आघाडीचा एकच उमेदवार देण्यात येणार असून सर्व जागांवर आघाडीचे उमेदवार उतरवले जाणार आहेत. येणाऱ्या २ डिसेंबरला निवडणुका होणार असून उमेदवारांची यादी लवकरच जाहीर केली जाणार असल्याचे या परिषदेत सांगण्यात आले. पक्षनिहाय वाद विसरून एकत्र येऊन तळेगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ही निवडणूक लढवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. पत्रकार परिषदेमध्ये सर्वानुमते आघाडीच्या उमेदवारांवर निर्णय घेऊन काम करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी तळेगाव शहर युवक काँग्रेस अध्यक्ष विशाल वाळुंज, मावळ तालुका राष्ट्रवादी गटाचे अध्यक्ष दत्तात्रय पडवळ, शिवसेना पक्ष निरीक्षक भरत भोते, तळेगाव शहर शिवसेना शहराध्यक्ष शंकर भेगडे, मनसेचे समन्वयक सचिन भांडवलकर, शिवसेना समन्वयक सतीश गरुड, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष प्रदीप शिंदे, किरण मोकाशी आदी उपस्थित होते. “महाविकास आघाडीतील घटक पक्ष आपापल्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविणार असून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार ज्या पक्षाचा असेल त्या पक्षाचे चिन्ह घेऊन निवडणूक लढविणार आहे.” – दत्तात्रय पडवळ, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष (शरद पवार गट)