जम्मू-काश्मीरमधील स्फोटात चौघांचा मृत्यू
Updated On:

श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये सोमवारी झालेल्या स्फोटात ४ जण मृत्युमुखी पडले. ती घटना बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरमध्ये भंगारमालाच्या दुकानात घडली. त्या दुकानात एका ट्रकमधून काही सामग्री उतरवली जात होती.
त्यावेळी अचानकपणे मोठा स्फोट झाला. त्यामुळे संबंधित परिसर हादरला. स्फोटाचे नेमके कारण तातडीने समजू शकले नाही. स्फोटाची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि न्यायवैद्यक तज्ञांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
जम्मू-काश्मीरमध्ये मागील काही दिवसांत दहशतवादी कारवायांत वाढ झाली आहे. अशात घडलेल्या स्फोटामुळे त्या घटनेचे गूढ आणि गांभीर्य वाढले आहे.
त्यामुळे पोलिसांनी वेगाने तपास हाती घेतला आहे. त्याकामी इतर सुरक्षा यंत्रणांचेही सहकार्य घेतले जात आहे. स्फोट कशामुळे घडला ते न्यायवैद्यक अहवालानंतर समोर येऊ शकेल.





