सिंहगड किल्ल्यावर परदेशी पाहुण्यासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी चौघांवर गु्न्हा दाखल

Pune | छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यांचे प्रतिक म्हणून त्यांच्या गड किल्ल्यांकडे पाहिले जाते. पुण्यातील सिंहगड किल्ला हे त्याचे जाज्वल्य उदाहण आहे. हा किल्ला नरवीर तानाजी मालुसरेंच्या बलिदानाचे जीवंत स्मारक असलेला किल्ला आहे. शनिवारी या किल्लावर काही तरुणांनी एका परदेशी पाहुण्यासोबत असभ्य वर्तन करुन त्याला मराठीतून शिव्या देण्यास भाग पाडल्याचा संतापजनक प्रकार घडला. यानंतर संबंधित प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या संतापजनक प्रकारामुळे संतापाची लाट उसळून आली होती. या प्रकरणी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत अखेर टवाळखोरांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यूझीलंड येथील एक पर्यटक सिंहगड किल्ल्यावर ट्रेकसाठी गेला होता. त्यावेळी संभाजीनगर येथील आठ ते दहा तरुणांचा ग्रृपही ट्रेक करत होता. या ट्रेकदरम्यान ग्रृपमधील चार तरुणांनी परदेशी पाहुण्यासोबत गप्पा मारल्या. त्यानंतर तरुणांनी मराठीत परदेशी पाहुण्याला मराठीत शिव्या देण्यास भाग पाडलं. यानंतर या चीड आणणाऱ्या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे गडकिल्ले प्रेमी यांनी याबाबत नाराजी व्यक्त करत संबंधित तरुणांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.
नेमकं काय घडलं होतं?
न्यूझीलंड येथून पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर एक पदेशी युट्युबर पाहुणा आला होता. यावेळी त्याला महाराष्ट्रातील काही तरुण भेटले. पाहुण्याचे स्वागत करावे, आदरातिथ्य करावे, त्याची विचारपूस करावी हे सोडून या टवाळखोर तरुणांनी भलताच प्रकार केला. या टोळक्यातील तरुणांनी परदेशी पर्यटक पाहुण्याला काही अश्लील मराठी शब्द सांगून त्या भाषेत शिवीगाळ करण्यास भाग पाडले. सुरुवातीला त्यांच्या सांगण्यावरून त्याची नकळत शिवीगाळ केली. मात्र, आपण काहीतरी चुकीचं बोलत आहोत, याची जाणीव त्या पर्यटकाला झाली. या प्रकारानंतर आता येथे पुन्हा येणार नाही असंही त्या प्रर्यटकाने म्हटले असल्याची माहिती आहे.
टवाळखोर तरुणांनी परदेशी पर्यटकाला हीन दर्जाची वागणूक दिल्याप्रकरणी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. यामुळे आता संबंधित तरुणांवर काय कारवाई होणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. हा व्हिडिओ खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या कार्यकर्त्यांनी एक्सवर पोस्ट केला आहे. यानंतर सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.





