शिवसेनेचे माजी आमदार प्रकाश देवळे यांचे निधन; पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार

पुणे : शिवसेनेचे माजी आमदार आणि प्रति शिर्डी शिरगाव चे मुख्य विश्वस्त प्रकाश केशवराव देवळे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी 3 वा. वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.
कट्टर शिवसैनिक असलेले प्रकाश देवळे हे शिवसेनेतर्फे 1996 मध्ये विधान परिषदेवर निवडून गेले. शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख म्हणून त्यांची कारकीर्द गाजली. शिरगाव शिर्डी येथे त्यांनी साईबाबांची प्रतिशिर्डी उभी केली. अन्नछत्र उभारले. अनेक संस्था आणि संघटनांशी त्यांचा जवळचा संबंध होता.
नोकरदार, बांधकाम व्यावसायिक, ऑर्केस्ट्रा कार, सिनेमा निर्माते व दिग्दर्शक, राजकारणी ते प्रतिशिर्डीचे शिल्पकार असा त्यांचा उल्लेखनीय जीवनप्रकाश होता. नुकताच त्यांना नामदेव शिंपी समाजाचा समाज भूषण पुरस्कार देऊन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते.





