Pune Navratri Festival : महालक्ष्मी मंदिरात 108 मुलींचे कन्यापूजन
Pune Navratri Festival : पुण्यातील श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग येथे नवरात्रोत्सवानिमित्त १०८ मुलींचे कन्यापूजन करण्यात आले. मुलींचे पाद्यपूजन, औक्षण करून खाऊ व भेटवस्तू देण्यात आल्या.

Pune Navratri Festival : श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबागच्या वतीने सार्वजनिक नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात १०८ मुलींच्या कन्यापूजनाचे आयोजन करण्यात आले. बाल शिशु मंदिर आणि समर्थ विद्या मंदिर प्राथमिक शाळेतील मुलींनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. ‘या देवी सर्वभूतेषु, शक्तिरूपेण संस्थिता…’ या देवीच्या मंत्रघोषाने मंदिर परिसर भक्तिमय झाला.
नवरात्रीमध्ये लहान मुलींना देवीच्या विविध रूपांचे प्रतीक मानून त्यांची पूजा करण्याची परंपरा आहे. याच परंपरेनुसार सहभागी मुलींचे पाद्यपूजन आणि औक्षण करण्यात आले. त्यांच्यावर सुगंधित अत्तरपाणी शिंपडण्यात आले. मंदिर ट्रस्टच्या वतीने सर्व मुलींना खाऊ आणि भेटवस्तू देण्यात आल्या.
या वेळी अभिनेत्री पूजा पवार, अपूर्वा सपकाळ, मंदिर ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त व उत्सव प्रमुख डॉ. तृप्ती अग्रवाल, विश्वस्त प्रवीण चोरबेले आदी उपस्थित होते.
अमिता अग्रवाल म्हणाल्या, “श्री महालक्ष्मी मंदिरात श्री महाकाली, श्री महालक्ष्मी आणि श्री महासरस्वती या त्रिदेवी स्वरूपाचे पवित्र अधिष्ठान आहे. शक्ती, बुद्धी आणि धनधान्य देणाऱ्या देवीची विविध रूपे लहान मुलींमध्येही पाहायला मिळतात. मुलींनी केवळ पूजेपुरते मर्यादित न राहता प्रत्येक क्षेत्रात धैर्याने काम करावे. त्यांनी शिक्षण घेऊन मोठे व्हावे, तरच खऱ्या अर्थाने देवी प्रसन्न होईल.”





