Nagar | माजी महसूलमंत्र्यांनी फक्त पदे उपभोगली- माजी खासदार विखे पाटील

श्रीरामपूर, (प्रतिनिधी)- साडेसात वर्षे महसूलमंत्री पद उपभोगणाऱ्यांनी श्रीरामपूरातील खंडकरी शेतकऱ्यांना काहीही दिले नाही. याउलट जे 20 वर्षे होऊ शकले नाही ते आताचे राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी करून दाखवत खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनी विनामूल्य वर्ग 1 केल्याचे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.
श्रीरामपूर भारतीय जनता पार्टीसह शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आरपीआय व महायुतीचे कार्यकर्ते श्रीरामपूर शहर व तालुका यांच्यावतीने महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी श्रीरामपूर शहर वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा भूमिपूजन समारंभ तसेच जिल्हा नियोजन समिती अंतर्गत श्रीरामपूर न.पा. हद्दीतील 7 कोटी 11 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याहस्ते पार पडला. यावेळी महसूलमंत्री विखे पाटील यांची ग्रंथतुला करण्यात आली. याप्रसंगी डॉ. सुजय विखे बोलत होते.
शहरातील वॉर्ड नं.७ मध्ये असणाऱ्या थत्ते मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास माजी खा. डॉ.सुजय विखे पाटील, माजी खा.सदाशिव लोखंडे, मा आ.भाऊसाहेब कांबळे, जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, तालुकाध्यक्ष दीपक पटारे, विधानसभा समन्वयक नितीन दिनकर, केतन खोरे, शरद नवले,
अभिषेक खंडागळे, प्रकाश चित्ते, गणेश राठी, मारुती बिंगले, डॉ. शंकर मुठे, जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्यासह महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध विभागाचे अधिकारी,खंडकरी शेतकरी, बचतगटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सुजय विखे म्हणाले की, लोकसभेत तालुक्याने मताधिक्य दिले असल्याने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत श्रीरामपूरचा पुढचा आमदार हा महायुतीचाच होणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
खा. लोखंडे यांनी जिल्हा मुख्यालयाची घोषणा करा, या वक्तव्याचा धागा पकडून विखे म्हणाले, श्रीरामपूर तालुक्यात जनतेची कामे कुणालाच करायची नाहीत फक्त ‘जिल्हा करा जिल्हा करा’म्हणून आंदोलने करायची आहेत.
जिल्हा प्रश्न हा राजकारणाचा मुद्दा बनवला जातो आहे. इतर महत्वाच्या प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी हा मुद्दा उकरून काढला जातो.
भविष्यात कुठलाही जिल्हा झाला आणि कुणीही तो केला तरी आपल्या त्याला शुभेच्छा असतील, अशा शब्दांत बगल दिली. मा.खा.सदाशिव लोखंडे, भाऊसाहेब कांबळे, नितीन दिनकर यांचीही भाषणे झाली. आभार शरद नवले यांनी मानले.
माझी भूमिका ही स्टेपनीची
आमच्या कुटुंबात माझी भूमिका ही गाडीच्या स्टेपनीप्रमाणे झाली आहे. मुख्य टायर पंक्चर झाले की माझा वापर केला जातो. मीही ती जबाबदारी कुणाच्याही अधिकारावर गदा न आणता पार पाडत असतो, असे डॉ. विखे यांनी म्हणताच उपस्थितांत एकच हशा पसरला.





