Pakistan: इम्रान खान यांना निवडणुकीपूर्वी सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा, ‘सिफर’ प्रकरणात जामीन

Imran Khan: पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (२२ डिसेंबर) सायफर प्रकरणात पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे माजी अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान इम्रान खान आणि उपाध्यक्ष शाह मेहमूद कुरेशी यांच्या जामीन अर्जाला मंजुरी दिली. जिओ न्यूजने आपल्या वृत्तात याची पुष्टी केली आहे. इम्रान आणि कुरेशी हे दोघेही सिफर (Cipher) प्रकरणात आरोपी होते. दोघांनाही प्रत्येकी 10 लाख पाकिस्तानी रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.
जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, न्यायमूर्ती सरदार तारिक मसूद यांच्या अध्यक्षतेखालील आणि न्यायमूर्ती अतहर मिनाल्लाह आणि सय्यद मन्सूर अली शाह यांच्या तीन सदस्यीय खंडपीठाने हा आदेश जारी केला आहे.
पाकिस्तानच्या विशेष न्यायालयाने माजी पंतप्रधान इम्रान खान यांना सिफर प्रकरणात दोषी ठरवले होते. आज न्यायालयीन कामकाजादरम्यान सुप्रीम कोर्टात खान आणि कुरेशी यांच्या 23 ऑक्टोबरच्या आरोपाविरोधातील याचिकेवरही सुनावणी झाली. सुनावणीच्या सुरुवातीला, न्यायमूर्ती मसूद यांनी टिप्पणी केली की, आव्हान दिलेला आरोप इस्लामाबाद उच्च न्यायालयाने 21 नोव्हेंबर रोजी रद्द केला आहे.
काय आहे सिफर प्रकरण ?
सिफर प्रकरण हे काही राजनयिक दस्तऐवजांशी संबंधित आहे. इम्रान खान यांच्यावर राजकीय फायद्यासाठी राजनयिक कागदपत्रांचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. त्यामुळे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला होता. पीटीआय नेत्याने संबंधित राजनैतिक कागदपत्रे सरकारला परत केली नसल्याचा दावा पाकिस्तानच्या तपास संस्थेने केला आहे. दरम्यान, आता या प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे.





