प्रवीण गायकवाड हल्लाप्रकरणी दीपक काटेला जामीन; न्यायालयाकडून अटींसह दिलासा

सोलापूर – संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे झालेल्या शाईफेक आणि वंगणफेक प्रकरणात आरोपी दीपक काटे आणि भुवनेश्वर शिरगिरे यांना अक्कलकोट न्यायालयाने अटींसह जामीन मंजूर केला आहे. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी एम.एम. कल्याणकर यांच्या न्यायालयाने प्रत्येकी २० हजारांच्या जातमचुलक्यावर हा जामीन दिला.
१३ जुलै रोजी अक्कलकोटमध्ये शिवधर्म फाऊंडेशनचे पदाधिकारी व भाजपशी संबंधित दीपक काटे यांनी आपल्या साथीदारांसह गायकवाड यांच्यावर शाईफेक करत काळं वंगण ओतले. या वेळी गोंधळात धक्काबुक्की, मारहाण आणि गाड्यांच्या तोडफोडीचाही आरोप गायकवाड यांनी केला आहे. या घटनेनंतर राज्यभर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून अनेक संघटनांनी तसेच आमदार-खासदारांनी निषेध नोंदवला आहे.
याप्रकरणी दीपक काटेसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी दीपक काटे आणि शिरगिरेला अटक केली होती. सध्या दोघांनाही अटींवर जामीन मिळाल्याने दर आठवड्याला स्थानिक पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे आदेश दिले आहेत.





