BREAKING : राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू

पुणे : राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची खळबळजनक घटना रविवारी रात्री नाना पेठेत घडली. आंदेकर यांच्यावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराचा पोलिसांकडून शोध घेण्याात येत आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर माजी नगरसेवकावर गोळीबार करण्यात आल्याने मध्यभागात घबराट उडाली.
वनराज आंदेकर रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास नाना पेठेतील डोके तालीम परिसरात थांबले होते. त्यावेळी त्यांच्यावर हल्लेखोराने पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या झाडल्या. गोळीबार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर परिसरात घबराट उडाली. गोळीबाराच्या घटनेपूर्वी डोके तालीम परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता.
गोळीबारानंतर वनराज आंदेकर यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अखेर उपचारादरम्यान वनराज आंदेकर यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वनराज यांच्यावर निकटवर्तीयाने गोळीबार केला असून, कौटुंबिक वाद तसेच वर्चस्वाच्या वादातून गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. नाना पेठेत आंदेकर टोळीचा दबदबा आहे.
गणेश लक्ष्मण कोमकर, सोमनाथ सयाजी गायकवाड, तुषार आबा कदम, अशी संशयित आरोपींनी नावे आहेत. त्या गोळीबारानंतर पोलिसांकडून घटनास्थळ सील करून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.





