माजी आमदार सुनील टिंगरे पूरग्रस्तांसाठी सरसावले

पुणे : मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी माजी आमदार सुनील टिंगरे पुढे सरसावले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना एका महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत टिंगरे यांनी तीन महिन्यांची पेंशन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याची घोषणा केली आहे. तसेच, इतर माजी आमदारांनीही यासाठी पुढाकार घ्यावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.
मागील काही दिवसांपासून मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घालत मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान केले आहे. शासनाने शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी पूरग्रस्त भागाला भेट देत सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि माजी आमदार सुनील टिंगरे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पुढाकार घेतला आहे.





